डोकलाम पेचावर तोडगा निघाल्याचा भारताचा दावा

दोन्ही देशांचे सैन्य माघारी घेणार; चीनने मात्र आळवला वेगळा सूर

नवी दिल्ली – डोकलाम भागात भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तिढा सुटला असून दोन्ही देशांनी तेथील आपआपले सैन्य एकाच वेळी माघारी घेण्याचे ठरवले आहे अशी घोषणा भारताच्या विदेश मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. गेल्या जून महिन्यापासून डोकलाम भागात भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. तथापी त्यावर राजनैतिक चर्चेतून मार्ग काढण्यात आल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे. तथापी चीनने मात्र यावर वेगळाच सूर आळवला असून त्यांनी आम्हीं तेथे काही ऍडजसमेंट आणि सैन्य तैनातीची फेररचना करणार आहोत, त्या भागात आमच्या सैन्याचा पहारा (पेट्रोलिंग) सुरूच राहील असे चीनने म्हटले आहे.

डोकलामचा हा भाग भारत-चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमावर्ती भागातील तिठ्यावर आहे. या जागेवर भूतानची मालकी असली तरी हा भाग आपल्याच हद्दीचा भाग आहे असा दावा करीत चीनने तेथे रस्ते उभारणीचे काम सुरू केले होते. पण भारताने तेथे भूतानच्या बाजूने हस्तक्षेप करीत चीनच्या या रस्ते बांधणीला विरोध केला होता.

जून महिन्याच्या मध्याला हा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे प्रत्येकी तिनशे जवान तेथे डोळ्यालाडोळा भिडवून उभे होते. भारताने हे सैन्य मागे न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील असा इशारा चीनने वेळोवेळी दिला होता. तथापी तरीही भारताने तेथील आपले सैन्य मागे घेण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चीन मध्ये होणाऱ्या ब्रिक्‍स देशांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जाणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर डोकलाम मधील प्रश्‍नावर राजनैतिक चर्चेतून तोडगा काढण्यात आल्याची घोषणा भारताच्या विदेश मंत्रालयाच्या आज प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या संदर्भात चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चूनयिंग यांनी म्हटले आहे की आज 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 च्या स्थितीनुसार भारताने तेथील सैन्य माघारी घेतले आहे. तथापी आमचे त्या भागातील पेट्रोलिंग सुरूच राहणार असून आम्ही तेथे आवश्‍यकतेनुसार काही लष्करी बदल करीत आहोत. या बदलानुसार आमच्या लष्कराकडून त्या भागातील काही अडॅजसमेंट आणि डिप्लायमेंट केले जात आहे असा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे. तथापी ही ऍडजसमेंट म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. चीनी सैन्याच्या माघारीचा शब्दप्रयोग त्यांनी कटाक्षाने टाळून तेथील स्थिती बाबतची संदिग्धता कायम ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)