डोकलाममध्ये कोणत्याही आकस्मित परिस्थितीसाठी भारत तत्पर – निर्मला सितारामन

नवी दिल्ली – डोकलाममध्ये आकस्मितपणे उद्‌भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे, असे निसंदिग्ध प्रतिपादन संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी केले आहे. डोकलामबाबत आम्ही सतर्क आहोत आणि आमच्या संरक्षण दलांचे सातत्याने आधुनिकीकरण केले जात आहे. कोणत्याही आकस्मित परिस्थितीला तोंड द्यायला आम्ही समर्थ आहोत. आमचे भौगोलिक सार्वभौमत्व अबाधित राखले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

डोकलाममधील स्थितीमध्ये चीनी सैन्याने फेरबदल करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच डोकलामची कोंडी निर्माण झाली होती, असे वक्‍तव्य चीनमधील भारतीय राजदूत गौतम बंबवाले यांनी शनिवारी म्हटले होते. त्या पार्श्‍वभुमीवर सितारामन यांनी भारतीय लष्कराच्या सज्जतेबाबत हे प्रतिपादन केले आहे. चीनमधील क्विंगदोमध्ये 9 ते 10 जून रोजी होणाऱ्या शांघाय सहकार्य शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, असेही बंबवाले म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्याच चीन दौऱ्याचा तपशील पहिल्यांदाच वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. विदेश सचिव विजय गोखले हे 23 फेब्रुवारीला चीनला जाऊन आल्यावर पंतप्रधानांच्या दौऱ्याची निश्‍चिती करण्यात आली. चीनच्या तिबेटसंदर्भातल्या भूमिकेबाबत भारताने नाराजी व्यक्‍त केली आहे.

त्याच पार्श्‍वभुमीवर भारताने डोकलामबाबतची भूमिकाही पुन्हा स्पष्ट केली आहे. सीमेवरील भारतीय लष्कराची प्रतिक्रिया केवळ लष्करी नाही, तर राजकीय असल्याचेही बंबवाले म्हणाले होते. तिबेटच्या सरकारच्या “थॅंक्‍यू इंडिया’  अभियानांतर्गत आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांपासून सरकारी अधिकाऱ्यांनी दूर रहावे, यासाठी मंत्रिमंडळाच्या आदेशांची मागणी गोखले यांनी केली आहे. गेल्यावर्षी डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमने सामने उभे ठाकल्याने तब्बल दोन महिने कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. ही कोंडी 28 ऑगस्ट रोजी समाप्त झाली. डोकलाम भागात चीनकडून पायाभूत सुविधा उभ्या केल्या जात असल्याचे वृत्त बंबवाले यांनी फेटाळले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)