“डोंगरावर’ची शाळा झाली आनंददायी

प्रशांत घाडगे
पिंपरी – शहरातील महापालिकेच्या अनेक शाळांनी कात टाकण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन माध्यमातून शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल आहे. याच माध्यमातून शहरातील पूर्वेकडील शेवटच्या टोकावर असलेल्या चऱ्होली-पठारे मळा शाळेतील शिक्षक “बोलक्‍या भिंती’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. शाळेतील भिंतीवरती विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे एकेकाळी डोंगरावरची शाळा म्हणून संबोधली जाणारी ही शाळा आता आनंददायी शिक्षण देणारी शाळा ठरत आहे.

चऱ्होली-पठारेमळा या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यत सेमी-इंग्रजी माध्यमातील शाळा आहे. यापूर्वी, शाळेत अनेक अडचणी विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत होत्या. शाळेतील भिंतीना तडे जाऊन भिंती रंगहिन झालेल्या होत्या. पावसाळ्यात भिंतीमधून पाणी झिरपत असल्याने विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही नकोसे झाले होते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शिक्षक अमोल भालेकर व विवेक रासकर यांनी काळवंडलेल्या भिंतींना बोलके केले. या शिक्षकांनी शाळेतील वर्ग खोल्यामधील भिंतीवरती विविध प्रकारची चित्रे रेखाटून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, महापालिकेने शिक्षकांची धडपड बघून गळक्‍या छताची दुरुस्ती व शाळेच्या खिडक्‍या बदलल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती भिंतीवर चित्ररुपाने चितारण्यात आल्याने भिंतीच जणू विद्यार्थ्यांशी बोलू लागल्याचे जाणवत आहे. तसेच, या उपक्रमासाठी शोभा पठारे यांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी आर्थिक सहकार्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रांमधून मिळतायेत धडे
विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी भिंतीवर सप्तरंगी इंद्रधनुष्य, तारांगण, चंद्र, सूर्य रेखातलेली आहेत. तसेच, मराठी बाराखडी, मराठी-इंग्रजी महिने, दिशाज्ञान, व्याकरण, गणितीय सापसिडी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, व्याकरणाचे धडे गिरविण्यासाठी क्‍लुप्त्या, वाक्‍यप्रचार, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, जोडशब्द, पर्यावरणीय माहितीसाठी विविध प्रकारची झाडे, भौगोलिक माहिती, भारताचा व जगाचा नकाशा, इतिहास, विज्ञान, निसर्गविषयक माहिती, प्राणी-पक्ष्यांची चित्रे काढण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व संगीत कलेची माहिती होण्यासाठी तबला, पेटी, ढोलकी, ढग्गा, वीणा, सारंगी, हलगी यासारखी संगीतवाद्येही चितारलेली आहेत.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे हलके
चऱ्होली-पठारे मळा शाळेतील “बोलक्‍या भिंती’ या उपक्रमामुळे या शाळेचा नावलौकीक वाढलेला आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या पुस्तकातील गोष्टीच शाळेच्या भिंतीवर रेखाटल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. मागील काही दिवसात केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत नियमावली जाहीर केली होती. शहरातील इतर शाळांनी पठारे मळा शाळेचा आदर्श घेऊन हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे निश्‍चितपणे कमी होईल.

या शाळेत सुरुवातीला पटसंख्या अतिशय कमी होती. परंतु, “बोलक्‍या भिंती’ या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी आकर्षक होऊन आपल्या शाळेत प्रवेश घेतला. लोक सहभागातून शाळा, डिजीटल माध्यमाकडे वाटचाल करीत आहेत. सध्या शाळेकडे बारा टॅब व एक संगणक आहे. शाळेला पूर्वी डोंगरावरची शाळा असे संबोधले जात होते. परंतु, शाळेत मागील काही दिवसातील बदल पाहता डिजीटल शाळा म्हणून पाहिले जात आहे.
– अमोल भालेकर, शिक्षक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)