डॉ संचेती याना पुण्यभूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे महत्व वाढले – नितिन गडकरी

पुणे  – पुणे हे खऱ्या अर्थाने विद्वानांचे शहर आहे. परदेशात जिथे जिथे गेलो तिथे पुण्यातील विद्वान तरुण मला भेटले. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, या सारख्या सर्व स्थरात पुण्याने विद्वान दिले. त्यामुळे पुणे तिथे काय उणे ही उक्ती पुण्याने खरी ठरवली आहे. विद्वान व्यक्तींनी दुसऱ्या विद्वान व्यक्तींचा सन्मान पुण्यात करणे ही दुर्मिळ गोष्ट असते, डॉ संचेती याना पुण्यभूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे महत्व वाढले आहे असे मत केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले.
त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा 29 वा “पुण्यभूषण पुरस्कार’ पद्मविभुषण डॉ.के.एच.संचेती यांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळीं ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक डॉ. रघुनाथ माशेललकर, देवीसिंग शेखावत, डॉ शां. ब. मुजुमदार, प्रतापराव पवार, चंदू बोर्डे, सुधीर गाडगीळ, डॉ. सतिश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरणारी बालशिवाजी असलेले सन्मानचिन्ह, एक लाख रुपये ,शाल ,श्रीफळ असे पुण्यभूषण पुरस्काराचे स्वरूप होते. वसंत प्रसादे, मधुकर ताम्हस्कर, निरबहादूर गुरुंग, रामदास मोरे, अनिल लामखेडे, श्रीनिवास आचार्य या स्वातंत्र्य सैनिक ,गोवामुक्ती सैनिक आणि सैन्यदलात सेवा करताना जखमी झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
गडकरी म्हणाले, विद्वान व्यक्तींनी दुसऱ्या विद्वान व्यक्तींचा सन्मान पुण्यात करणे ही दुर्मिळ गोष्ट असली तरी पुण्यभूषण फाउंडेशन ने 29 वर्षे हा उपक्रम उत्तमरीत्या चालविला आहे. ज्या गावात आपण कार्यरत असतो, त्या गावाने दिलेला पुरस्कार महत्वाचा असतो,डॉ संचेती यांचे कार्यही पुरस्काराच्या तोलामोलाचे आहे. चांगला डॉक्‍टर असण्याबरोबर ते समाजातील चांगली व्यक्तीही आहेत, पैसा डॉक्‍टरने कमवावा मात्र सामाजिकभान, संवेदनशिलता जपणे आवश्‍यक असते ते काम डॉ. संचेती यांनी केले आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ संचेती म्हणाले, पुणेकरांनी मला भरपूर प्रेम दिले. घरून मिळालेले कामाचे बाळकडू ,मित्रप्रेम आणि पत्नीची साथ यामुळे मला यश मिळाले. आईच्या धाडसी स्वभावाला समोर ठेवून मी अध्ययन सुरु असतानाच हॉस्पिटल सुरु केले. ज्ञान आणि सेवा ही वैद्यकीय जीवनात महत्वाची असते, यापुढेही मी उर्वरित आयुष्यात पुणेकरांची आणि रुग्णांची सेवा करणार आहे .
श्रीनिवास पाटील म्हणाले, पुण्यभूषण चे सर्व 29 पुरस्कार सोहळे पाहिलेला मी आहे. आज माझ्या उपस्थितीत डॉ संचेती यांचा गौरव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. माणसे जोडणारी, हाडे जोडणारी आणि मने जोडणारी माणसे आज या व्यासपीठावर एकत्र आली ,याचा आनंद उत्तम मैफलीसारखा आहे.
पालकमंत्री बापट यांनी खास पुणेरी स्टाईलने चौफेर फटकेबाजी करत मला दिल्लीला पाठवण्याची लोकांना का घाई झाली आहे? असा प्रश्‍न विचारत पुण्याचा पालकमंत्री झालो हे माझे भाग्य असल्याचे नमुद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश देशपांडे यांनी केले, सुरेश धर्मावत यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)