डॉ. भारत पाटणकर व संघटनेकडून हेकेखोरपणा

आ. शंभूराज देसाई : तामकणे पाणी योजनेबाबत जिल्हा प्रशासनाची भूमिका रास्तच

काळगाव – प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली नाथाची पाग येथील तामकणे, ता. पाटण येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये विनाकारण राजकारण आणले जात आहे. येथील स्थानिक राजकारण्यांनी आणि संघटनांनी येथील प्रकल्पग्रस्तांची ढाल करुन स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नाथाची पाग येथे उपलब्ध असणारे पाणी तामकणे गावास देण्यास येथील जमिनमालकाने परवानगी दिली आहे.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी व संबधित पाणी पुरवठा अधिकारी प्रत्यक्ष पाहणीवरुनच पालकमंत्री यांनीही नाथाची पाग येथील उपलब्ध असणारे पाणी हे तामकणे गावास देण्याचे आदेश दिले आहेत. यात गैर असे काहीच नाही. मात्र, डॉ. भारत पाटणकर व संघटनेचा तामकणे पाणी योजनेबाबत हेकेखोरपणा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाची भूमिका रास्तच आहे. डॉ. भारत पाटणकर आणि त्यांची संघटना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कसले राजकारण करताय? असा सवाल आ. शंभूराज देसाई यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात आ. शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे की, नाथाची पाग येथे उपलब्ध असणारे पाणी हे येथील प्रकल्पग्रस्तांना देवूनही शिल्लक रहात असल्याने हे पाणी तामकणे गावास पिण्याकरीता देण्यात यावे, असे संबधित पाणी पुरवठा विभागाने सांगितल्यानंतरच आमदार फंडातून गावास पिण्याच्या पाण्याची योजना देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयानेही सर्व कागदपत्रांची तपासणी करुनच योजनेकरीता मंजुरी दिली आहे.

केवळ आडमुठेपणाचे धोरण राबवून तामकणे गावास पाणीच मिळवून द्यायचे नाही, असा अट्टाहास आणि बालहट्ट येथील स्थानिक राजकारण्यांनी आणि संघटनेने करत प्रकल्पग्रस्तांना वेठीस धरले आहे. कोणत्याही परिस्थितीत करुन द्यायची नाही, हा आडमुठेपणा स्थानिक राजकारणी व डॉ. भारत पाटणकर यांना शोभत नाही. याच मंडळींनी जाणिवपूर्वक प्रकल्पग्रस्तांना भडकावले असून त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना न्यायालयापर्यंत जाण्यासाठी भाग पाडले आहे. ही बाब आता न्यायप्रविष्ठ झाली आहे.

जिल्हा प्रशासनानेही या राजकारण्यांचा व संघटनेचा डाव काय आहे हे चांगलेच ओळखले आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी महाराष्ट्राला पाणी दिले त्याच प्रकल्पग्रस्तांना या पाण्यासाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडणे हे आपल्यासाठी लाजिरवाणे आहे. प्रकल्पग्रस्तांची ढाल करुन स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्यांना यातून काही साध्य होणार नाही, असाही टोला आ. देसाई यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)