डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : घटनेला पाच वर्ष पूर्ण

पुणे – 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नेहमीप्रमाणे ज्येष्ठ लेखक रा. ग. जाधव यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानातून मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. बालगंधर्व रंगमंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवरुन ते शनिवार पेठेतील निवासस्थानाकडे परतत होते. ते पुलाच्या मध्यभागी आले असतानाच मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर पिस्तूलातून लागोपाठ चार गोळ्या झाडल्या.

डॉ. दाभोलकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. पुलाच्या शेजारीच पोलीस चौकी आहे. तसेच त्या वेळी नाकाबंदीही होती. मात्र पोलिसांनाही गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. थोड्या वेळाने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दाभोलकरांची हत्या झाल्याची बातमी राज्यभर पसरली.

-Ads-

याप्रकरणाचा तपास लगेचच गुन्हे शाखेकडे देण्यात आला. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने 10 तर पुणे पोलिसांनी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले. दरम्यान, मारेकऱ्यांचे स्केचही प्रत्यक्षदर्शी व्यक्तीकडून माहिती घेऊन जाहीर करण्यात आले होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या तपासातील घटनाक्रम :
2013
20 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या.
गुन्हे शाखेची तपास पथके रवाना, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात
22 ऑगस्ट : घटनास्थळावरील पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले
23 ऑगस्ट : पोलिस ठाण्यांच्या पातळीवर तपास पथके
25 ऑगस्ट : भोंदूबाबा, बनावट डॉक्टर, ज्योतिषी यांची चौकशी सुरू
26 ऑगस्ट : एटीएस प्रमुख आणि पुणे पोलिसांची एकत्रित बैठक
27 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना तपासाबाबत सूचना
28 ऑगस्ट : दुचाकींच्या नंबरप्लेट आणी सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू
29 ऑगस्ट : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासणीसाठी मुंबई आणि तेथून लंडनला
29 ऑगस्ट : गोव्यातील आश्रमातून एक साधक ताब्यात
30 ऑगस्ट : सुमारे 8 कोटी फोन कॉल्ससह ई-मेलची तपासणी सुरू
2 सप्टेंबर : संशयितांचे रेखाचित्र तयार, बॅलेस्टिक अहवाल पोलिसांना प्राप्त
6 सप्टेंबर : रेखाचित्राशी साधर्म्य असलेल्या 17 जणांची चौकशी
19 डिसेंबर : मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना कोठडी

2014
16 जानेवारी : गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरू
13 मार्च : नागोरी आणि खंडेलवालची प्रत्यक्षदर्शींकडून ओळखपरेड
3 एप्रिल : विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना
9 मे : गुन्हे शाखेकडून तपास सीबीआयकडे सोपविला
3 जून : तपासाची कागदपत्रे सीबीआयच्या ताब्यात
6 जून : सीबीआय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
19 ऑगस्ट : गुन्हेगार अजून फरार असल्याची माहिती
15 नोव्हेंबर : हत्या प्रकरणाच्या चौकशीत गांभीर्याने लक्ष घालण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन.

2015
2 ऑगस्ट : तपासाबाबत अंनिसचे राष्ट्रपतींना पत्र
21 नोव्हेंबर : मारेकऱ्यांचे रेखाचित्र पुन्हा एकदा प्रसिद्ध
3 डिसेंबर : डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही – गृह राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

2016
17 फेब्रुवारी : “सनातन’चे साधक नीलेश शिंदे, हेमंत शिंदेच्या न्यायवैद्यक चाचणीस (पॉलिग्राफ टेस्ट) न्यायालयाची मंजुरी
31 मे : सीबीआयचे वीरेंद्र तावडे (पनवेल) व सारंग अकोलकर (पुणे) यांच्या घरी छापे
4 जून : सीबीआय तपासासाठी लंडनच्या स्कॉटलंड यार्डची मदत घेण्याबाबत चर्चा
14 जून : वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा न्यायालयात दावा
16 जून : मडगाव स्फोट, मिरज दंगलीत तावडेचा हात
18 जून : मारेकऱ्यांना पोलीस अधिकाऱ्याने प्रशिक्षण दिल्याची चर्चा

2017
1 मार्च : मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास सीबीआय व मुंबई गुन्हे शाखेतर्फे 5 लाखांचे बक्षीस जाहीर
20 मे : तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमण्याची “अंनिस’ची मागणी
5 ऑक्टोबर : न्यायालयाने वीरेंद्र तावडे याचा जामीन अर्ज फेटाळला

2018
21 मे : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या अमोल काळेसह पाच जणांना कर्नाटक “एसआयटी’कडून अटक
30 जून : अमोल काळे याच्याकडील डायरी जप्त, डायरीत वैभव राऊतचा उल्लेख, कर्नाटक-महाराष्ट्रातील लेखक, विचारवंतांसह 36 जण “हिट लिस्ट’वर.
6 जुलै : न्यायालयाने वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला
10 ऑगस्ट : अमोल काळेच्या डायरीनुसार मुंबईतून वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांना अटक
11 ऑगस्ट : राऊतसह दोघांचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय.

कर्नाटकात गौरी लंकेश यांचा मारेकरी पकडल्यावर महाराष्ट्रातही वेगाने तपासाची “लिंक’ सापडत गेली. यामुळे तपास यंत्रणा योग्य ट्रॅकवर चालत असल्याचे दिसून आले आहे. तपासाची हीच गती ठेवल्यास लवकरच मास्टर माईंडपर्यंत पोहचता येऊ शकेल. डॉ. दाभोलकरांवर प्रत्यक्षात गोळी झाडणारा सापडला आहे. तर, या अगोदर वीरेंद्र तावडे याला अटक करण्यात आली होती. कोणाला मारायचे, हे त्याने मारेकऱ्यांना सांगितले होते. तावडेचा अगोदरपासूनच डॉ. दाभोलकरांचा विरोधक होता. साक्षीदारांच्या जबाबातही तसेच दिसून आले आहे.
– मिलींद देशमुख, राज्य कार्यवाह, अंनिस.

स्फोटकांप्रकरणी “एटीएस’ने मागील आठवड्यात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली होती. आरोपींकडून अनेक शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती. यातूनच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील कळसकर याचा सहभाग पुढे आल्यानंतर अंदुरेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आले. पाच वर्षांनंतर ही कारवाई मोठी आणि महत्त्वाची मानावी लागेल. सीबीआयने केलेल्या वीरेंद्र तावडेच्या पहिल्या अटकेला जवळपास दोन वर्षे झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. कर्नाटक एसआयटीने केलेली प्रगती आणि अंनिसने केलेली आंदोलने यामुळे हे शक्य झाले. आता पोलिसांनी मास्टरमाईंडपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
– हमीद दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)