डॉ.दाभोलकर हत्याप्रकरण : शरद कळसकरनेच गोळ्या झाडल्या

सीबीआयचा न्यायालयात दावा : कोठडीत 10 सप्टेंबरपर्यंत वाढ

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकरने दोन गोळ्या झाडल्या होत्या, असा दावा करत सीबीआयतर्फे मंगळवारी न्यायालयात कळसकरच्या पोलिस कोठडीची मागणी करताना करण्यात आली. न्यायालयाने त्याला 10 सप्टेंबरपर्यंत सीबीआय पोलिस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. ए. सय्यद यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.

शरद कळसकरचा याने डॉ. दाभोलकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणातील अटक आरोपी राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर, शरद कळसकर यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. त्यासाठी कळसकरची 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजय ढाकणे यांनी न्यायालयात केली होती.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेला आरोपी शरद कळसकरचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रकरणात संबंध असल्याचा आरोप असल्यामुळे मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याचा ताबा सोमवारी सीबीआयकडे सोपविला होता.

महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात तपास सुरु केल्यानंतर दाभोलकर हत्येसंदर्भात माहिती समोर आली. त्याआधारे सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली. त्याच्या चौकशीत शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसकरचा दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध असल्याचे समोर आले होते. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी एटीएसने कळसकरसह अन्य आरोपींना न्यायालयात हजर केले होते. सीबीआयने त्याच्या ताब्याची मागणी केली होती. सीबीआयला कळसकरचा ताबा देण्यात आला होता. त्याला मंगळवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.

कळसकर हा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी सीबीआयकडून करण्यात आली.तर आरोपी कळसकरतर्फे अॅड. धर्मराज चंडेला यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात सारंग अकोलकर, विनय पवार यांनी गोळ्या झाडल्याचा उल्लेख आहे.

याप्रकरणात सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. त्याच्या पोलिस कोठडीत शस्त्र, दुचाकी जप्त करण्यात आली नाही. अंदुरेला घटनास्थळी नेऊन नवीन थिअरी पोलिस मांडत आहेत, असे अॅड. चंडेला यांनी युक्तीवाद करताना न्यायालयाला सांगितले. तसेच कळसकरच्या पोलिस कोठडीला विरोध केला.

शरद कळसकर याचा शस्त्र हाताळण्यास हातखंडा आहे. त्यानेच दाभोलकरांवर दोन गोळ्या झाडल्या आहेत. या गोळ्यांनीच दाभोलकरांचा मृत्यू झाला. तसेच कळसकर हा वेगवेगळ्या अॅक्‍टिव्हीटीजमध्ये कार्यरत असल्याचे न्यायालयात सरकारी वकिलांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)