शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत 15 सप्टेंबरपर्यंत वाढ


 राजेश बंगेरा, अमित दिगवेकर न्यायालयीन कोठडीत

 

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात पोलीस कोठडीत केलेल्या तपासात प्रगती नसल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाला फटकारले.

कोल्हापूर “एसआयटी’ अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप राजेश बंगेरा याने न्यायालयात केला. दरम्यान, न्यायालयाने शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत 15 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला आहे. तर, राजेश बंगेरा, अमित दिगवेकर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी हा आदेश दिला आहे. बंगेरा आणि दिगवेकर यांच्या तपासातील प्रगती दाखवता न आल्याने आणि काय तपास करायचा हे पटवून न देता आल्याने दोघांचीही येरवडा कारागृहात रवानगी झाल्याची नामुष्की सीबीआयवर ओढवली.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी कळसकर, बंगेरा, दिगवेकर या तिघांना सीबीआयने सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपींकडे चौकशी करून झालेला तपास सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केस डायरीच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर केला. त्यानुसार दिगवेकर आणि बंगेरा याला दि.14, तर कळसकर याला दि.17 सप्टेंबरपर्यंत कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. “डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील शुटर कळसकर आणि अंदुरेला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण बंगेराने दिले आहे. दिगवेकर हा हिंदू जनजागृती संघाचा साधक असून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्याशी त्याचा जवळचा संबंध होतो. त्याने याप्रकरणात “रेकी’ केली आहे. कळसकर याने डॉ. दाभोलरकरांवर दोन गोळ्या झाडल्या असून
काळे आणि कळसकर यांची एकत्रितपणे चौकशी करायची आहे,’ असा युक्तिवाद ऍड. ढाकणे यांनी केला.

बचाव पक्षाचे वकील ऍड. धर्मराज चंडेल म्हणाले, “काळे याच्याकडेदेखील एसआयटीने सीबीआयच्या कोठडीत असताना चौकशी केली होती. बंगेरा याच्याकडे देखील एसआयटीने गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत चौकशी केली. तसेच तपास अधिकारी यांच्या समोरच त्याला मारहाण केली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही, असे मागील सुनावणीदरम्यान ऍड. ढाकणे यांनी सांगितले आणि युक्तिवाददेखील केला नाही. मात्र, याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या प्रतींमध्ये कुठेही नमूद करण्यात आलेले नाही की, सरकारी वकिलाने न्यायालयात युक्तिवाद करू नये. त्यामुळे ढाकणे यांनी न्यायालयाची दिशाभूल केली,’ असे त्यांनी म्हटले.

हा मुद्दा ऍड. ढाकणे यांनी खोडून काढला. ते म्हणाले, “अशी कोणतीही ऑर्डर नव्हती. मी माझे म्हणणे लेखी स्वरूपात दिले होते.’ नंतर ऍड. चंडेल म्हणाले, “आरोपी पोलिसांना सहकार्य करीत आहे. मात्र त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसंनी योग्य तपास करता आलेला नाही. तसेच कोठडीसाठी देण्यात आलेल्या यापूर्वीच्या रिमांडमध्ये जी कारणे होती, त्याचा तपास झाला की नाही हे सीबीआयने स्पष्ट केलेले नाही,’ असे ऍड. धर्मराज यांनी न्यायालयात सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)