डॉ. जयंत नारळीकरांनी जागविल्या पुलंच्या आठवणी

द. मा. मिराजदार यांच्या हस्ते “विशेष सन्मान’ पुरस्कार प्रदान

पुणे – साहित्यिकांच्या कलाकृतींच्या पार्श्‍वभूमीवर विज्ञानकथा लिहायच्या, अशी माझी पद्धत होती. मी पुलंच्या “बटाट्याची चाळ’ या कथेवर आधारित विज्ञान कथा लिहिली. “बटाट्याच्या चाळीत उडती तबकडी’ या कथेचे वाचन पुलंच्या घरी सुनिताबाईंनी केले, तेव्हा शेजारी पु.ल.देशपांडे होते आणि अधूनमधून ते हसत होते. तेव्हा मला “ज्या माणसाने बृहन्महाराष्ट्राला हसवले त्या व्यक्तीला आपण्‌ हसवू शकलो’ याचे बरे वाटले. अशी पुलंबद्दलची आठवण डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितली.

पु.ल. आणि माझ्यामध्ये “विनोद’ आणि “बटाटेवडा’ या दोन गोष्टी कॉमन होत्या, ही आठवण त्यांनी यावेळी सांगितली. ते पुलोत्सवांतर्गत आयोजित “विशेष सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांना ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिराजदार यांच्या हस्ते “विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणेरी पगडी, उपरणे, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार, कोहिनुर ग्रुपचे विनीत गोयल, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, मयूर वैद्य, नयनीश देशपांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

“मी आणि माझी पत्नी आम्ही पुलंच्या “वाऱ्यावरची वरात’ या नाटकाला गेलो होतो. तेथे होणाऱ्या गर्दीमुळे आम्ही नाटकाला आलो आहोत हे आम्ही कोणाला कळू दिले नाही. पण मध्यांतरानंतर पुलंनी आम्हांला बोलावून घेतले आणि नाटकाच्या पुढील भागांत आम्ही आल्याचे जाहीरपणे सांगितले. गर्दीला टाळण्यासाठी पाच मिनिटे आधी आम्ही निघून माझ्या मामांकडे गेलो, ज्यांना हे माहिती होते. आमचे ऐकून घेतल्यानंतर मामांनी पुलंना फोन केला आणि ते पुलंना म्हणाले, “तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडली’, अशी पुलंनी लक्ष्मणरेषा ओलांडल्याचे उदाहरण विनोदी शैलीमध्ये डॉ.जयंत नारळीकरांनी सांगितले.

“मला सुनिताबाईंचा फोन आला, त्यांनी अभिनंदन केले. नंतर भाईंना बोलायचे असे म्हणत पुलंकडे फोन दिला. ते अभिनंदन म्हणाल्यानंतर मी का असे विचारल्यावर ते वेळ आल्यावर कळेल असे म्हणाले. थोड्या वेळाने दूरदर्शनवर मला “राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याचे सांगितले, “यावेळी पुलंनी लक्ष्मणरेषा ओलांडली नाही, असे नारळीकर आवर्जून म्हणाले. पुलंनी आयुकाला देणगी दिली होती. आणि ती देणगी ज्या इमारतीला वापरली त्या इमारतीला “पुलस्त्य’ असे नाव दिल्याचेही नारळीकरांनी सांगितले. त्यांनी विनोदात्मक शैलीत सांगितलेल्या अँड्रो क्‍लेज आणि सिंहाच्या गोष्टीने रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.

“मसापमध्ये त्यांनी केलेले भाषण आजही मला आठवते. सुसंस्कृतता, माहिती आणि श्रोत्यांना आवाहन या गोष्टींनी परिपूर्ण असलेले ते भाषण “उत्कृष्ठ भाषण कसे असावे’ याचे उदाहरण आहे. त्यानंतर समारोप करताना मी ते भाषण श्रोत्यांच्या कानात रहावे यासाठी मी वेगळा समारोप करणार नाही असे म्हणालो होतो”, असे ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार म्हणाले. “आज पुन्हा त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला, ते शेजारीही आहेत पण दुर्दैवाने मी ते ऐकु शकत नाही कारण माझे ऐकण्याचे यंत्र हरवले आहे”, असेही त्यांनी विनोदी शैलीत रसिकांना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)