डॉ. आंबेडकर – क्रांतिकारी विचारांचे अर्थतज्ज्ञ

एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. आंबेडकरांचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स येथे झाले. त्यांना त्यांचे शिक्षण परिश्रमपूर्वक व आर्थिकदृष्ट्या तणावाच्या परिस्थितीत मिळवावे लागले. अनपेक्षित ठिकाणांहून भेदभावच हाती लागल्यामुळे ते अत्यंत व्यथित झाले होते. म्हणूनच डॉ. आंबेडकरांचे सामाजिक दुष्प्रवृत्तींबद्दलचे विचार व त्यांचे व्यक्‍तित्व यांचा विचार केला पाहिजे.

डॉ. आंबेडकरांची नाळ ही कायमच भारतातील पददलित सामाजिक गटांच्या छळवणुकीशी व दयनीय अशा भारतीय आर्थिक परिस्थितीशी जोडलेली राहिली. त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्यांचा कल सार्वजनिक वित्त या विषयाकडे झुकला कारण त्याचा संबंध राज्याची धोरणे आणि लोककल्याण यांना स्पर्श करून जातो. डॉ. आंबेडकरांना एक कुठलेही साचेबद्ध व्यक्‍तिमत्त्व म्हणून समजून घेणे निश्‍चितच कठीण आहे. आणि अशाच एका प्रयत्नामधे अंबिराजन हे त्यांच्या ईपीडब्ल्यू लेखामध्ये लिहितात, आंबेडकर निश्‍चितपणे जुडिओ-ग्रीक ज्ञानप्रसार परंपरेमधील होते आणि ते एक उदयोन्मुख आधुनिकतावादी होते.

हे त्यांच्या अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विधी, समाज याबाबतीत असलेल्या दृष्टिकोनातून व अगदी त्यांच्या कपड्यांच्या सवयींमधूनसुद्धा दिसून येते. आपण या बहुलवादी बहुआयामी व्यक्‍तिमत्वाकडे जनकल्याणाच्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. त्यांच्या हृदयात राष्ट्रीय कल्याणाचा विचार होताच.

डॉ. आंबेडकरांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या वित्तीय धोरणांच्या महसूल पद्धतीचे विश्‍लेषण केले आणि त्यातून जमीन कर कसा अत्यंत शोषण स्वरूपाचा आहे व त्यामुळे देशातील रयतेचे कंबरडे कसे मोडले आहे, हे स्पष्ट करून दाखवले. त्या ठिकाणी त्यांनी दारिद्य्राचे मूळ कशात आहे, याकडे लक्ष वेधले. भारताच्या वसाहतवादी राज्यकर्त्यांनी अतिरिक्‍त नफा मिळवण्याकरिता महसूल खर्चापेक्षा कसा जास्त ठेवला, हे त्यांनी दाखवून दिले.

भारतात ब्रिटिश राजवट ऐन भरात असताना एक भारतीय विद्वान ब्रिटिश सरकारच्या शोषण स्वभावाबद्दल अतिशय स्पष्टवक्‍तेपणाने लिहीत होता आणि त्यातील काही भाग तर इंग्लिश भूमीवरून लिहीत होता. ज्या काळी जगभरात कुठेही भारतीयांविरुद्ध राजद्रोहाचा कायदा सर्रासपणे वापरला जात होता त्या काळी ही बाब निश्‍चितच क्रांतिकारक म्हणावी लागेल.
कोलंबिया येथे अर्थशास्त्राचा अभ्यास करताना डॉ. आंबेडकरांनी प्रो. गोल्डनवाईजर यांच्या उपस्थितीत मानववंशशास्त्रावर एक परिसंवाद आयोजित केला व तो अर्थशास्त्राच्या कोणत्याही विषयाशी संबंधित नसून “भारतातील जाती’ या विषयावर होता.

या निबंधामध्ये त्यांनी जातींची आर्थिक पाळेमुळे कुठपर्यंत पोहोचली आहेत याचा संपूर्णपणे मागोवा घेतला. विचार करण्याची ही प्रवृत्ती संपूर्णपणे वेगळी होती व ती अशा प्रकारच्या विषयांवर काम करणाऱ्या जगातील इतर कोणालाही सुचली नव्हती. सामाजिक किंवा आर्थिक कोणत्याही प्रकारच्या शोषणाचा, विशेषत: या दोन्हीच्या एकत्रीकरणाचा, त्यांना तिटकारा होता.

डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्रावरील लेखन थोडे अधिक सखोलपणे वाचले तर असे लक्षात येईल की, याला राजकीय अर्थशास्त्राचा आधार आहे व यामध्ये चर्चिलेली तत्त्वे ही परंपरागत सिद्धांतांच्या मर्यादेत राहात नसून त्यांचा अतिशय नवीन मूलगामी अर्थ लावला गेलेला आहे. डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय विचार एका निबंधामध्ये एकत्र करण्याचा विचार करणे कठीण आहे. परंतु या एकमेवाद्वितीय अर्थशास्त्रज्ञाचे व्यक्‍तिमत्त्व आतापर्यंत समर्थनीयरीत्या समजून घेतले गेलेले नाही. इथे त्या दृष्टीने एक अतिशय सूक्ष्म प्रयास केलेला आहे.

ईस्ट इंडिया कंपनीची वित्तव्यवस्था
डॉ. आंबेडकरांचे हे लेखन ढोबळमानाने “सार्वजनिक वित्त’ या विषयाखाली मोडते. सर्वसामान्य जनसमुदायाच्या कल्याणावर परिणाम करणाऱ्या राष्ट्रीय धोरणे व कोषागाराचे कामकाज या दोन गोष्टींशी सार्वजनिक वित्तव्यवस्था निगडित असल्याने त्यांनी प्रथम या विषयाला हात घातला. लोककल्याण तसेच राष्ट्रीय व्ययाचे घटक या दोन्ही गोष्टी
डॉ. आंबेडकरांच्या हृदयाच्या अगदी समीप होत्या.

कदाचित भारतीय उपखंडामध्ये आपली पोलादी पकड बसवण्याकरिता वसाहतवादी राज्यकर्त्यांनी कोणती आर्थिक साधने वापरली हे समजून घेण्याकरिताच त्यांनी आपला एमएचा प्रबंध “ईस्ट इंडिया कंपनीची वित्तव्यवस्था’ या विषयावर लिहिण्याचा निर्णय बहुधा घेतला असावा. त्याकाळी इंग्लंडमधील अनेक जणांना त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीकडे टाकलेल्या या छिद्रान्वेषी दृष्टिक्षेपाचा रागही आला असेल. ईस्ट इंडिया कंपनी ही आर्थिक व्यवस्था अतिशय परिणामकारकरीत्या वापरून भारतीय अर्थव्यवस्थेमधून कमाल नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत होती.

डॉ. आंबेडकरांना या घटनेची पूर्ण जाणीव होती आणि आपल्या प्रबंधाच्या प्रारंभीच त्यांनी असे अधोरेखित केले आहे की, वसाहतवादी राज्यकर्त्यांचा मानस भारतातील सर्व साधनसंपत्ती पिळून घेण्याचा आहे. ते लिहितात, भारताने इंग्लंडकरिता दिलेल्या योगदानाच्या अफाटपणाइतकेच इंग्लंडने भारताला दिलेल्या योगदानाचे शून्यत्व, हे उघडपणे आश्‍चर्यकारक आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील साधनसंपत्ती ज्या पद्धतीने संपुष्टात आणली, त्याबद्दल त्यांचे मत स्पष्ट होते आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासकीय पद्धतीचे विश्‍लेषण करताना ते कंपनी नियंत्रित करणाऱ्या बोर्डाचे वर्णन “कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स’ आणि “कोर्ट ऑफ डायरेक्‍टर्स’ असे करतात.

गव्हर्नर जनरलचे वर्णन ते असे करतात की, एकाच हाती सर्व सत्ता एकवटलेला असा स्वायत्त अधिपती म्हणजे गव्हर्नर जनरल. आपल्या प्रबंधाच्या सुरुवातीच्या काही पाठांमध्ये डॉ. आंबेडकरांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक व्यापारी संस्था ते एक स्वायत्त अधिपती प्रमुखपदी असलेली राजकीय सत्ता नियंत्रण करणारी हुकुमत असा झालेला बदल अधोरेखित केला आहे. ईस्ट इंडिया कंपनीने वापरलेल्या आर्थिक पकडीचे विस्तृतपणे विश्‍लेषण करून, त्यांनी भारतातून महसूल कशा प्रकारे जमा केला जात होता, हे दाखवून दिले आहे.

जमीन महसुलातील जमीनदारी व रयतवारी पद्धतींचे वर्णन करीत त्यांनी ब्रिटिश भारतातील महसूल पद्धतीचे सखोल विश्‍लेषण केले आहे. त्यापुढे अफूवरील कर, मिठावरील कर, कस्टम्स, तंबाखूवरील कर, वाहनांवरील कर, अबकारी ड्यूटी, स्टॅंपड्युटी आणि इतर गोष्टींवरील महसुलाच्या तपशिलांमधेही ते पुढे गेलेले दिसतात. या सगळ्यामुळे स्थानिक जनतेचे नुकसान होऊन कंपनीचा महसूल मात्र वाढत राहिला.

या प्रबंधात डॉ. आंबेडकर ब्रिटिश भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने मिळवलेल्या महसुलाची खूप मोठ्या प्रमाणावरील माहिती परिश्रमपूर्वक गोळा करतात तसेच गव्हर्नर जनरलच्या आदेशान्वये ईस्ट इंडिया कंपनीने केलेले खर्चही ते दाखवून देतात. साधने आणि पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेबाबत जॉन ब्राईट यांचे उद्‌गार वापरताना, डॉ. आंबेडकर दाखवून देतात की, केवळ स्थानिक प्रधानांच्या आणि संस्थानांच्या अधिपत्याखालील प्रदेशातच केवळ उपयुक्त कामे केली जात होती.

याकरिता आधार म्हणून ते डॉ. स्प्रेज यांचे लेखन “मॉडर्न इंडिया’ (1937)चा संदर्भ देतात. ब्रिटिशांनी लादलेले जमिनीवरील व इतरही कर निश्‍चितच शोषण करणाऱ्या स्वरूपाचे होते. डॉ. आंबेडकर कर्नल ब्रिग्ज यांचे शब्द उद्‌घृत करतात की, भारतामध्ये अस्तित्वात असलेला जमीन कर, जो जमीनदारांचे सर्व भाडे सामावून घेतो, तो यापूर्वी भारत किंवा आशियातील कोणत्याही सरकारच्या कारकिर्दीत अस्तित्वात नव्हता.

महसूल अधिकाऱ्यांनी श्रमांमधील आकर्षकता संपूर्णपणे संपवून टाकली. सूज्ञ वाचकास डॉ. आंबेडकरांच्या लेखनामध्ये मार्क्‍सिझमचा सूक्ष्म भास होईल. आपण जाणतो की त्यानंतर त्यांनी मार्क्‍स आणि बुद्ध यांच्यामधील समानशीलता दाखवण्याकरिता इतर ठिकाणी अधिक सखोल विश्‍लेषण करून लिहिलेही आहे.

प्रा. डॉ. विलास आढाव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)