डॉ.आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित केलेल्या शासनाच्या इंग्रजी मासिक “महाराष्ट्र अहेड’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झालेल्या अवमानप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत लोकराज्य हे मासिक मराठी, हिंदी, गुजरातीमध्ये काढले जाते, तर इंग्रजी आवृत्ती “महाराष्ट्र अहेड’ या नावाने प्रकाशित होते. त्याचे प्रकाशनाचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या इंग्रजी मासिकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणीच्या छायाचित्राऐवजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे छायाचित्र छापण्याचा प्रताप करण्यात आला. ही गोष्ट डॉ. बाबासाहेबांचा अवमान करणारी तर आहेच. परंतू माजी मुख्यमंत्री देशमुख यांचाही अवमान झाला आहे. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर सरकारने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

या चुकीच्या छपाईला कोण जबाबदार आहे ते शोधून त्यांच्यावर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही विधीमंडळात यावर आवाज उठवू. सध्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात केवळ मुख्यमंत्र्याच्या प्रतिमा उजळवण्याचे खासगी काम सुरू आहे. खासगी कंपनीमार्फत महामित्र तयार करण्यात येत होते, त्यावर आम्ही सभागृहात आवाज उठविला तेव्हा सरकारने ही योजना गुंडाळली, असेही चव्हाण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)