डॉल्बी वाजवून ध्वनीप्रदूषण करू नका

दौंड येथील शांतता समिती बैठकीत पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांचे आवाहन
दौंड, – उत्सव साजरा करताना कायद्याची चौकट पाळली गेली पाहिजे. आपल्याला जसे मनोरंजन व जल्लोष हवा असतो, तसे इतरांना शांततापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. आपले अधिकार जरूर मिळवा. मात्र, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करू नका. डॉल्बी वाजवू नका, दुसऱ्याला त्रास झाला तर कायद्यानुसार कारवाई होणारच, असा स्पष्ट इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिला.
दौंड उपविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व बकरी ईद शांतता समितीची बैठक नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात झाली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील मान्यवरांच्या शांतता समितीला मार्गदर्शन करताना अधिक्षक हक बोलत होते. ते म्हणाले की, गुन्हेगारी कमी करण्यासाठी दौंड नगरपालिकेने सी.सी.टी.व्ही. बसविण्याचा उपक्रम हाती घ्यावा. प्रत्येक मंडळाने आपापल्या परिसरात अशी यंत्रणा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा. कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कान, डोळे जरूर व्हावे पण पोलीस होऊन कायदा हातात घेऊ नये.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय थोरात, नगराध्यक्षा शीतल कटारिया, उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, भाजपाचे किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे, तानाजी दिवेकर यांच्यासह नगरसेवक, तालुक्‍यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीच्या वेळी अरुणा डहाळे, हेमलता परदेशी, शफी पठाण, मतीन शेख, राजू बारवकर, तानाजी दिवेकर, वासुदेव काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)