डॉल्बीचा नाद करायचा नाय…

(मिलन म्हेत्रे)

शांताबाई… बानुबया… सुपारी फुटली… आवाज वाढव डीजे… या प्रकारच्या उडत्या गाण्यांना ग्रामीण भागातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही पसंती मिळवली आहे. त्या गाण्याच्या तालावर डीजेंचे आवाज वाढतात आणि त्यावर नाचणाऱ्यांना आवाजाचे आणि वेळेचेही भान राहत नाही. डीजेला बंदी आहे… मात्र ती बंदी कुठे आहे, तर फक्त लग्नाच्या वरातींना, जत्रांमध्ये किंवा विविध जयंत्यांच्या मिरवणुकींना, डीजेंच्या भिंती उभ्या करायच्या नाहीत, एका विशिष्ट डेसिबलच्या आवाजाच्या पुढे आवाज न्यायचा नाही… आदी अनेक कायदे केले गेले आहेत; पण, मिरवणुकीत डीजे लावले गेले नाहीत तरी सध्याच्या लग्नसराईच्या काळात कार्यालयाच्या बाहेर किंवा लॉनच्या बाहेर डीजेबसचा वापर केला जातोच आहे.

खेड, चाकण, बारामती, दौंड, भोर, जुन्नर आदी भागांत अनेक कार्यालये महामार्गाला लागूनच आहेत. त्यामुळे तेथून निघणाऱ्या वराती या महामार्गावरच काढल्या जायच्या आणि वाहतुकीची तासन्‌ तास कोंडी होताना दिसायची. यावर उपाय म्हणून या मिरवणुका आणि डीजे बंद केले गेले. मात्र, कार्यालयाबाहेर त्याचा वाढणारा आवाज येथील रहिवासी क्षेत्रात त्रासदायक ठरत आहे. लग्नसराईबरोबरच सध्या परीक्षांचा काळही लक्षात घ्यावा लागतो. आपल्याकडे त्याला आलेले स्वरूप हे नागरिकांच्याच नाही तर भारतातील विकृत स्वरूपाचे दर्शन जगाला घडवत आहे. आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त हे भर दुपारी असतात. वैशाख वणवा पेटलेला असतो, यावर्षी तर तो फाल्गुन संपता संपताच जाणवू लागला. तापमान 40 च्या वर गेले आहे. अशा वेळी भर दुपारी डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांना वेळेचे भान राहत नाही, मुहूर्त टळून जातात. उन्हातान्हात वरातीत फिरताना अगदी नवरदेवासह अनेकांना चक्कर येणे, उलट्या होणे… असे त्रास होतात; पण तरीही डीजेचा ताल हवाच

 • कायदे व नियम तोडण्याची मानसिकता
  डीजेला बंदी असून देखील अजूनही काही ठिकाणी त्याचा वापर केला जातो आहे. गेल्या वर्षी ठाण्याच्या एका आदिवासी पाड्यात हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावला गेला, त्याबाबत तक्रार आल्यावर पोलिसांनी कारवाई केली, ऐकले नाही तेव्हा पोलिसांचा सौम्य काठी हल्ला केला. त्यात नवरदेवाचा भाऊ आणि आई दोघे जखमी झाले… हीच गोष्ट पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातही घडली होती. डीजे लावून लग्नाची मिरवणूक काढण्यात आली आणि सुमारे दीड लाखाचा दंड पोलिसांनी या लोकांवर ठोकला. प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी न घेता मालवाहू वाहनात अनधिकृतपणे बदल करून, त्याचा डीजे म्हणून वापर केल्याबद्दल साहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एका वाहन मालकाला तब्बल 1 लाख 30 हजार रुपये दंड केला आणि वाहन मूळ स्वरूपात आणेपर्यंत वाहनाची नोंदणी रद्द केली आहे.

डीजेच्या आवाजाची क्षमता आणि दंड
डीजेच्या मिरवणुकींना, भिंतींना बंदी आहे. रहिवासी क्षेत्रात 55 ते 45 डेसिबल अनुक्रमे दिवसा आणि रात्री अशी आवाजाची क्षमता ठेवण्यास परवानगी आहे, तसेच शांतताप्रवण क्षेत्रात अनुक्रमे 50 ते 40 डेसिबल क्षमता आहे. ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन केल्यास 2000च्या एनव्हायरनमेंट ऍक्‍ट 1986 च्या कलम 15 प्रमाणे पाच वर्षांची कैद किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. एकदा नोटीस दिल्यावर पुन्हा जर असे कृत्य झाले तर सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. या नियमानुसार गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असून, असे गुन्हे प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे चालतात.

 

डीजे बस बनवण्यासाठी लाखोंची गुंतवणूक
डीजेच्या एका बसमागे तासानुसार 15 ते 20 हजारांपासून 50 हजारांपर्यंत भाडे मिळते. डीजेच्या बस अत्यंत सुंदर पद्धतीने डेकोरेट केल्या जातात. या बस तयार करण्यासाठी जुन्या बस किंवा 407 अथवा 709 चे ट्रक वापरले जतात. ट्रकचे या गाड्या बनवण्यासाठी एकूण खर्च 15 लाखांपासून 50 लाखांपर्यंत होतो. एसी आणि नॉन एसी असलेल्या या डीजेच्या गाड्यांचा व्यवसाय लग्नसराईत म्हणजे दिवाळीपासून पूढे मे-जून पर्यंत चालतो. डीजेच्या गाडीमध्ये येथील वाद्यांची उपकरणे वाजवण्यासाठीसाधारणपणे सात ते आठ लोकांना रोजगार मिळतो.

 • स्पीकरचाही वापर
  डीजेंच्या बरोबरीनेच मोठे स्पीकर बॉक्‍स देखील वापरले जातात. त्यांच्या किमती 20 हजारांपासून तीन लाखांपर्यंत आहेत. पुण्यात अशा स्पीकरची मोठी बाजारपेठ असून, तेथे लाखोंची उलाढाल होते. ग्रामीण भागातून स्पीकरसाठी मोठी मागणी असते. या स्पीकरचे बॉक्‍स स्थानिक पातळीवर पुण्यातच बनवल जातात, मात्र त्याचे ऍम्पिलफायर हे मुंबई किंवा दिल्लीतून मागवले जातात. याबरोबरच चिनी साऊंड सीस्टिम तुलनेने कमी किमतीत असल्याने त्यालाही मागणी वाढली आहे. अलीकडच्या काळात हॅंगिंग साऊंड सीस्टिमचे फॅड वाढते आहे. स्पीकरच्या भिंती बांधण्यासाठी होणारा त्रास आणि धोका यात नाही, आणि “रेड’ पडणार असे लक्षात आल्यास हे हॅंगिंग बॉक्‍स काढून पळवणेही सोपे झाले आहे.
 • व्यवसाय अडचणीत
  लाखो रुपये खर्च करून डीजे सीस्टिम तयार गेल्या आहेत. ग्रामीण भागात या व्यवसायात लग्नसराईच्या काळातच पैसा मिळत होता; पण त्यावर बंदी आणल्यामुळे आता हा व्यवसायच अडचणीत आला आहे. या व्यवसायासाठी तयार केलेल्या गाड्यांची विक्री देखील होत नाही. एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असताना देखील डीजेंच्या वाहनांवर कारवाई होते, त्यामुळे हा व्यवसाय जवळपास बंदच आहे.
  – संजय चव्हाण, चाकण, डीजे व्यावसायिक
 • छोट्या सेट-अपवर चालवणे शक्‍य आहे
  डीजे किंवा डॉल्बीच्या किमती आणि त्यांचा आवाज या सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर सरकारने सरसकट सगळ्या गोष्टींना बंदी घालण्यापेक्षा लहान “सेट-अप’ला परवानगी देणे गरजेचे आहे. हे सेट बनवण्यासाठी आठ ते दहा लाखांचे कर्ज घेतले आहे; पण ते कर्जही आता फेडू शकत नाही. याच व्यवसायावर आमचे घर अवलंबून आहे, त्यात रोजगार नाही. त्यामुळे या व्यवसायाकडे आम्ही वळलो होतो. आवाजाची मर्यादा पाळावीच लागते. एखाद्या पार्टीने आवाज वाढवण्याची मागणी केली तर ऑर्डर कॅन्सल करणेच उचित ठरते.
  – नितेश पठाडे, डीजे चालक संघटना, माजी अध्यक्ष
 • डीजे, स्पीकर यांमुळे आवाजाचे प्रदूषण होते, हे खरे आहे आणि त्याचमुळे याद गोष्टींवर बंदी आणली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी आढळून आल्या तर त्यावर कारवाई करणे, कोर्टात खटले-गुन्हे दाखल करणे यासाठी पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. कोणाची तक्रार आली तरी देखील लगेच कारवाई केली जाते आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्यासाठी या गोष्टींची आवश्‍यकत आहे.
  नितीन जोशी, अधीक्षक, प्रदूषण नियंत्रण खाते, पुणे

————————————————–

– रेखा साळुंके, सिनिअर पोलीस इन्स्पेक्‍टर, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)