डॉक्‍टरांच्या वादात “आरोग्य बिघडले’

पिंपरी – शहरात स्वाईन फ्लू रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाच्या उपाययोजना निष्फळ ठरु लागल्या आहेत. त्यातच विद्यमान प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी व अतिरिक्‍त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वाद विकोपाला गेला आहे. मात्र, दोन्ही डॉक्‍टरांच्या खुर्चीच्या वादात पिंपरी-चिंचवडकरांचे आरोग्य बिघडू लागल्याचे चित्र दिसत आहे. याकडे ना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचे लक्ष आहे, ना संबंधित दोन्ही वरिष्ठ डॉक्‍टर अधिकाऱ्यांचे? त्यामुळे महापालिका हद्दीत स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीचे आजार बळावू लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.28) स्वाइन फ्लूचे तब्बल सहा रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठ महिन्यात एकाच वेळी सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. नवीन रुग्ण वाढल्यामुळे शहरात स्वाइन फ्लूची संख्या 293 वर पोहोचली आहे. तर शहरात आजपर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये आणखी 11 संशयितांच्या रुग्णांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याशिवाय 42 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. स्वाईन फ्लू आजार कमी करण्यासाठी वैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राबविलेल्या उपाययोजना निष्फळ का? ठरु लागल्या आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकारी गांभिर्यांने घेत नसल्याने यंदा आठ महिन्यात स्वाइन फ्लूच्या मृतांची संख्या 36 वर पोहोचली आहे.
शहरात स्वाइन फ्लूचे दररोज एक किंवा दोन रुग्ण आढळत होते. या रुग्ण संख्येत अचानक वाढ होऊन दर पाच ते सहा रुग्ण दिवसाकाठी आढळत आहेत. महापालिका रुग्णालयात टॅमी फ्लूच्या गोळ्या, लस दिली जाते. तरीही रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाच्या उपाययोजना कमी पडू लागल्यानेच स्वाईन फ्लूसह साथीचे आजारात वाढ होत आहे. दरम्यान, महापालिकेच्या दोन वरिष्ठ डॉक्‍टर हे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या खुर्चीसाठी भांडत राहिल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

वैद्यकीय विभागावर विश्‍वास नाय का?
महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना सोमवारी (दि.28) 42 संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या. तर 319 रुग्णांना सर्दी, तापासारख्या आजारांनी त्रास जाणवत आहे. 11 संशयितांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविले आहे. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 293 झाली असून, आतापर्यंत 7 हजार 280 संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)