डॉईश बॅंक, बारक्‍लेज्‌ संघांची विजयी सलामी !!

व्हिवासियस करंडक कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धा
पुणे, दि. 20 – डॉईश बॅंक आणि बारक्‍लेज या संघांनी अनुक्रमे विन्सेयस व सिमेन्टीक या संघांचा पराभव करताना व्हिवासियस करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. गो प्लेअरच्या वतीने आयोजित ही स्पर्धा व्हीडीआर क्रिकेट मैदानावर सुरू आहे.
स्पर्धेत साहील वशिष्ठ याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर डॉईश बॅंक संघाने विन्सेयस संघाचा 94 धावांनी दारुण पराभव केला. डॉईश बॅंक संघाने 20 षटकांत 3 बाद 228 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये साहील वशिष्ठ याने 63 चेंडूत 13 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 118 धावा चोपल्या. साहीलला विवेकानंद जेना (35), शौर्वा भांडूत (27) व गौरव सचदेव (16) यांनी मोलाची साथ दिली.
प्रत्युत्तरात विन्सेयस संघाचा डाव 17.3 षटकांत 134 धावांत संपुष्टात आला. विनायक कदम (50) व प्रशांत धाडवे(49) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. डॉईश संघाकडून विक्रम गोडा याने 14 धावांत 6 विकेट घेतल्या. डॉईशच्या साहील वशिष्ठला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात बारक्‍लेज संघाने सिमेन्टीक संघाचा 9 गडी राखून पराभव केला. सिमेन्टीक सॉफ्टवेअर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 129 धावा केल्या. यामध्ये अमित सिंघई (43) व जेश जुनेजा (29) यांनी संघाला सव्वाशेचा टप्पा गाठून दिला. प्रत्युत्तरात बारक्‍लेज संघाने 14.4 षटकांत 1 बाद 133 धावा करून विजयाची नोंद केली. पी. चेतन (38), पंकज मिश्रा (51) आणि कनिष्क सिंग (39) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. चेतन आणि पंकज यांनी 60 चेंडूत 71 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. त्यानंतर पंकज आणि कनिष्क यांनी 28 चेंडूत 64 धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक
गटसाखळी फेरी – 1) डॉईश बॅंक- 20 षटकांत 3 बाद 228 (साहील वशिष्ठ 118, विवेकानंद जेना 35, शौर्वा भांडूत 27, गौरव सचदेव 16) वि.वि. विन्सेयस- 17.3 षटकांत सर्वबाद 134 (विनायक कदम 50, प्रशांत धाडवे 49, गोलंदाजी – नरेंद्र कोस्टा 2-2, विक्रम गोडा 14-6, गौरव सचदेव 26-2). सामनावीर – साहील वशिष्ठ.
2) सिमेन्टीक सॉफ्टवेअर – 20 षटकांत 6 बाद 129 (अमित सिंघई 43, जेश जुनेजा 29, गोलंदाजी – कनिष्क सिंग 12-1) पराभूत वि. बारक्‍लेज – 14.4 षटकांत 1 बाद 133 (पी. चेतन 38, पंकज मिश्रा 51, कनिष्क सिंग 39, गोलंदाजी – निखील भोगळे 34-1); सामनावीर – पंकज मिश्रा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)