डेंग्यू, स्वाइन फ्लूने दमछाक; उद्रेक रोखण्याचे आव्हान

– सागर येवले

पुणे – यंदा डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक केली. त्यावर नियंत्रण आणण्यास आरोग्य विभागालाही यश मिळाले असून भविष्यात हा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य विभाग विशेषत: पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग अजूनही कमी पडत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अवयव प्रत्यारोपणाबाबत जागृती
नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महापालिकेला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच राज्य पातळीवर मोठे बदल झाले असून, अनेक संशोधन आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे अवघडातील अवघड शस्त्रक्रिया पुण्यात होत असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात पुण्याचा लौकिक झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याला अवयव प्रत्यारोपणामुळे अनेकांना जीवनदान मिळवून देण्यात पुणे झोनल ट्रान्सफ्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) यांचा मोलाचा वाटा आहे.

स्वाइन फ्लू आणि डेंगीचा प्रादूर्भाव
जुलै ते नोव्हेंबरदरम्यान शहरात स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढले होते. त्याचबरोबर डेंग्यू, चिकनगुणिया आणि मलेरियाच्या आजाराने रूग्णालये “फुल्ल’ झाली होती. अनेक अतिदक्षता विभागांत जागा नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. त्यामुळे मिळेल तेथे उपचार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. वर्षभरात साधारण 10 लाख नागरिकांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 592 जणांना स्वाइन फ्लूची लागण, तर 17 हजार 250 संशयितांना टॅमीफ्लूची औषधे देण्यात आली. तर, काहींना जीव गमवावा लागला.

गोवर-रुबेला लसीकरण
वर्षाच्या अखेरीस केंद्र व राज्य शासनाकडून देशात गोवर-रूबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात असून, शहर आणि जिल्ह्यात मिळून तब्बल 22 लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरणाच्या सुरूवातीला दत्तवाडी आणि हडपसर येथे घडलेल्या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे बालकांना लस देण्यात पालक टाळाटाळ करू लागले. परंतू, डॉक्‍टर आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी याबाबत जागृती केली. त्यामुळे जिल्ह्यात 80 टक्के लसीकरण मोहीम पूर्ण झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत चार लाख, तर जिल्ह्यात तब्बल 9 लाख बालकांना लस देण्यात आली आहे.

अवयव दानामुळे अनेकांना जीवनदान
राज्यात अवयवदानाबाबत जनजागृतीची चळवळ जोर धरत असतानाच प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीचा पुणे विभाग हा अवयवदानात अव्वल ठरला आहे. पुण्यात गेल्या 9 महिन्यांत 51 ब्रेनडेड रुग्णांनी अवयवदान केले. सर्वाधिक म्हणजे 65 मूत्रपिंडांचे दान करण्यात आले. त्यापैकी 59 मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झाले. 10 जणांना हृदयदान करण्यात आले असून त्यापैकी पुण्यात 7 तर अन्य बाहेरील रुग्णांना देण्यात आले. 47 जणांना यकृत दिले. दोघांचे फुफ्फुस मिळाले असून, ते चेन्नई आणि मुंबईतील रुग्णांना दान करण्यात आले. 6 जणांनी त्वचा दान केली. 72 डोळे, तर पाच जणांना स्वादुपिंडासह मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. दोन जणांच्या हातांचेही दान करण्यात आले आहे. या अवयवदान चळवळीमध्ये विविध संस्था, संघटना मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहे.

आरोग्य विभागात बदलांची गरज
वैद्यकीय क्षेत्रात अनेक बदल झाले. नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे सर्वप्रकारच्या शस्त्रक्रियेतून नागरिकांना जीवनदान मिळाले. त्याचबरोबर नवनवी संशोधने झाली. मात्र, सर्वसामान्यांना परवडेल अशी उपचार पद्धती सध्या काही मोजक्‍याचा रुग्णालयांमध्ये मिळत आहे. अव्वाच्या सव्वा बिलांवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे गरीब आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने त्यावर ठोस भूमिका घेणे आवश्‍यक आहे. ससून रूग्णालय हायटेक झाले असून सर्वसामान्यांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)