डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले

पिंपरी – शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सद्यस्थितीत स्वाईन फ्लू आजार आटोक्‍यात आला आहे. मात्र, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत दिवसें-दिवस वाढ होत आहे. साथीच्या आजाराचा फैलाव वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गर्दी होत आहे. मलेरिया व डेग्यू रोखण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना सुरु आहेत. मात्र, नागरिकांनीही काळजी घ्यावी असे आवाहन, महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 24 हून अधिक रुग्णांना मलेरियाची लागण झाली आहे. या वर्षात जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक 8 रुग्णांना मलेरियाची लागण झाली होती. प्लाझमोडियम या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णाला थंडी वाजते. थंडीचा कालावधी पंधरा मिनिटे ते तासभर असतो. दुपारनंतर ताप येतो व घाम येऊन तो कमी होतो. त्याबरोबरच डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी अशी लक्षणे जाणवतात. मलेरिया या आजाराची नुकतीच लागण झाली असेल तर ही लक्षणे सौम्य असतात. त्यामध्ये सुरुवातीस फक्त अंगावर काटा येणे, सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे यासारखी लक्षणे आढळतात. रक्तनमुना तपासल्याशिवाय मलेरिया या आजाराची लागण झाली आहे की नाही हे लक्षात येत नाही. यामुळे, मलेरियाची लक्षणे जाणवल्यास रक्तचाचणी करून घेणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्‍यता असते. ही शक्‍यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्लाझमोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जाण्याची व दगवण्याची शक्‍यता असते. काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात. या गंभीर आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. अशा वेळी रुग्णांला त्वरित वैद्यकिय उपचार मिळणे गरजेचे असते. या आजारावर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत.

त्वरीत औषधोपचार गरजेचे
आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांवर उपचार केले जात असून थंडी-ताप आल्यानंतर लगेचच डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. त्याचप्रमाणे सोसायटी व घराजवळील पाण्याच्या टाक्‍यांमध्ये गप्पी मासे सोडले पाहिजे. जेणेकरून हिवताप पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होणार नाही. या आजारामुळे येणारा ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परिसरात स्वच्छता ठेवणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच, रुग्णांमध्ये मलेरिया या आजाराची लक्षणे वाटल्यास डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)