डेंग्यूचा 103 जणांना “डंख’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “स्वाईन फ्लू’बरोबर डेंग्यूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्यापासून अद्यापपर्यत डेंग्यूचे 103 बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. शहरात पसरलेले साथीचे आजार आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याने ते नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत आहे.

“स्वाईन फ्लू’ने नागरिकांचे जीव जाण्याचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत असताना डेंग्यू, मलेरियाचाही प्रादूर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. शहरात जुलै महिन्यात 8 ऑगस्ट महिन्यात 53 तर सप्टेंबर महिन्यात 42 बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच, अद्यापपर्यत 1261 संशयित रुग्ण आढळले आहेत. शहरात मलेरियाचे अद्यापपर्यत 23 बाधित रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते जून महिन्यापर्यत डेंग्यूचा एकही रुग्ण शहरात आढळला नाही. मात्र, पावसाळा सुरु झाल्यानंतर डेंग्यूच्या बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे, शहरात साथीच्या आजाराने बाधित रुग्णांचा आकडा वाढत असूनही महापालिकेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया यासारखे जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

-Ads-

डेंग्यू हा आजार “प्लाझमोडियम’ या डासाच्या चावण्यामुळे बळावतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी अशी लक्षणे दिसून येतात. तसेच, मलेरिया आजाराने सतत डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे, थंडी वाजणे अशी लक्षणे जाणवतात. मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येण्याची शक्‍यता असते. या प्रकारची लक्षणे लहान मुलांमध्यी जास्त प्रमाणात जाणवतात. या प्रकारच्या आजाराने रुग्ण दगावण्याची शक्‍यता असल्याने नागरिकांनी तत्काळ वैद्यकीय उपचार मिळणे आवश्‍यक असते.

खासगी रुग्णालयांना आवाहन
शहरात साथीचे आजार फैलावल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या आजारामुळे रुग्णांची परिस्थिती चिंताजनक बनल्याने काही रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. खासगी रुग्णालयाने रुग्णांकडून विनाकारण जादा पैसे घेऊ नयेत. तसेच, अनावश्‍यक तपासणी व औषधे घेण्यास भाग पाडू नये. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास खासगी रुग्णालयाने तातडीने कार्यवाही करुन डिस्चार्ज द्यावा. तसेच, महापालिका हद्दीतील धर्मादायच्या नियमानुसार जे रुग्ण मोफत उपचारासाठी पात्र असतील अशांना खासगी रुग्णालयांनी मोफत उपचार द्यावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)