“डुक्‍करमुक्‍त पुणे’ पहिल्याच दिवशी “फेल’

कपाळावर हात मारण्याची वेळ : कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण

पुणे – महापालिकेने मोकाट डुक्कर पकडण्यासाठी सुरू केलेली कारवाई पहिल्याच दिवशी “फेल’ गेली. या मोहिमेवरील कर्मचाऱ्यांनी हडपसर येथे लावलेल्या जाळीतून डुकरे शिताफीने निसटल्याने या कर्मचाऱ्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली. प्रशिक्षणाअभावी हा प्रकार घडला असून, कर्मचाऱ्यांना पुढील दोन दिवस डुक्कर पकडण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोकाट डुकरांमुळे उपद्रव होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. प्रामुख्याने, हडपसर, महंमदवाडी, कोंढवा, बिबवेवाडी, येरवडा या भागात डुकरांचा सुळसुळाट प्रचंड वाढला आहे. महापालिकेने मोकाट डुकरांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनीही मुख्यसभेत वारंवारकेली आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारपासूनच डुक्कर पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी डुक्कर पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांची पथके तयार करून त्यांना जाळ्या आणि पुरेशी साधने उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय पोलीस बंदोबस्तही दिला आहे. मात्र त्यांना डुक्कर पकडण्याचे कोणतेच प्रशिक्षण न दिल्याने, त्यांचा पहिला दिवसच फेल गेला असून, डुकरांनी या कर्मचाऱ्यांनाच सळो की पळो करून सोडले. म्हणूनच या कर्मचाऱ्यांना पुढील दोन दिवस पुरेसे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली.

बंदिस्त जागा द्या
वराह पालनाचा व्यवसाय करणाऱ्या सुमारे 150 जणांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. वराह पालन करणारा समाज आजही शिक्षणापासून आणि सामाजिक सुविधांपासून वंचित आहे. वराह पालनावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्यास कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल. यासाठी महापालिकेने वराह पालनासाठी बंदिस्त जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. महापालिकेने यापूर्वी मुंढवा येथे जागा देण्याचा प्रस्ताव तयार केला. परंतु त्यावर अजून कुठलाच निर्णय झाला नाही. अन्य मोकाट प्राण्यांना वेगळा न्याय आणि डुकरांना वेगळा न्याय लावू नये. शहरात एकही मोकाट डुक्कर राहू नये यासाठी शहराच्या चारही बाजूला मुंढवा, खडकवासला, उरूळी देवाची, पिंपरी सांडस, वारजे माळवाडी या ठिकाणी वराह पालनासाठी बंदिस्त जागा उपलब्ध करून द्यावी आणि प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)