‘डीबीटी’ निधी वाटपात “प्रिटींग मिस्टेक’

पाल्यांच्या गणवेशासाठी पदरमोड करावीच लागणार

पुणे – महापालिका शाळांमधील मुलांना यावर्षीपासून शालेय साहित्य तसेच गणवेशाची रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यात देण्यात आली आहे. मात्र, ती निश्‍चित करताना, गणवेश रकमेची “प्रिटींग मिस्टेक’ झाल्याने पाचवी ते सातवीदरम्यानच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पदरमोड करून गणवेश घ्यावा लागत आहे.

मुलांच्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा करताना इयत्ता पहिलीतील मुलांना दिलेल्या रकमेपेक्षाही कमी रक्कम पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना दोन गणवेशांची रक्कम मिळाली असली, तरी प्रत्यक्षात यात एकच गणवेश मिळत आहे. दरम्यान, या प्रकारावरून महापालिका प्रशासनाने हात वर केले असून या मुलांना आता कोणतीही वाढीव रक्कम देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

असा झाला गोंधळ
महापालिकेच्या भांडार विभागाने विद्यार्थ्यांना दिलेली गणवेशाची रक्कम खुल्या बाजारातून दर मागवून निश्‍चित करण्यात आली होती. त्यात चांगल्या दर्जाचा गणेवश घेता यावा, यानुसार हे दर निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, वर्षभराच्या 2 गणवेशांची रक्कम मुलांच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यानुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांना 732 रुपये, दुसरीसाठी 756 रुपये, तिसरीसाठी 782 रुपये, चौथीसाठी 804 असा चढत्या क्रमाने दर निश्‍चित केली आहे. त्यानुसार, ही रक्कम मुलांच्या खात्यात देण्यात आली. वास्तविक याच चढ्या दराने या मुलांनाही गणवेशाची रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता प्रशासनाने पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी 720 रुपये ही एकच रक्कम निश्चित केली. धक्कादायक बाब म्हणजे, पहिलीच्या मुलाच्या गणवेशासाठी असलेल्या रकमेपेक्षाही ही रक्कम 12 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे बाजारात पाचवी ते सातवीच्या मुलाचा गणवेश 500 ते 700 रुपयांपर्यंत एक मिळत असताना पालिकेने या मुलांना गणवेशासाठी प्रत्येकी 360 रूपये दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या प्रकारास भांडार विभागप्रमुख तुषार दौंडकर यांनी दुजोरा दिला असून “प्रिटींग मिस्टेक’मुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ही चूक मराठी, इंग्रजी, उर्दु माध्यमांसोबतच विद्यानिकेतन शाळांच्या विद्यार्थ्यांबाबतीतही घडली आहे.

वाढीव रक्कम मिळणार नाहीच
गणवेशासाठी निर्धारित रकमेचे वाटप पूर्ण झाल्याने त्यात आता गणवेश रकमेची वाढ करता येणार नाही, असे प्रशासकीय सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे आधीच अनेक पालकांचे पैसे बॅंकांच्या किमान शिलकीच्या अटीमुळे बॅंकाच्या घशात गेले असतानाच; आता गणवेशाची रक्कमही कमी आल्याने हातावर पोट असलेल्या पालकांच्या मुलांना आता संपूर्ण वर्षभरासाठी एकाच गणवेशावर शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याची वेळ येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)