डीबीटीद्वारे वाटप वस्तूंचा सर्व्हे सुरू

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 24 – जिल्हा परिषदेकडून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या वैयक्‍तिक लाभाच्या योजना (डीबीटी) दिवाळीपूर्वीच राबविल्या जाणार आहे. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी या योजनेमध्ये सुसूत्रता आणून त्याचे आत्तापासून योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून डीबीटीद्वारे वाटप करण्यात येणाऱ्या वस्तूंचा मार्केट सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार या सर्व्हेचा अहवाल खरेदी समितीसमोर मांडण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनांकडून सांगण्यात आले.

गतवर्षी डीबीटी योजनेचा खेळखंडोबा झाला. मे महिन्याअखेरपर्यंत हा खेळखंडोबा सुरू होता. त्याची प्रचिती पुन्हा 2018-19 या आर्थिक वर्षात येऊ नये, लाभार्थ्यांना त्याचा फटका बसू नये यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ठोस पावले उचलली आहेत. यंदा दिवाळीपूर्वीच डीबीटी प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थ्यांना अनुदान वाटप व्हावे, त्यांची दिवाळी गोड व्हावी, अशा सूचना अध्यक्ष देवकाते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार कृषी आणि पशुपालन, महिला आणि बालकल्याण आणि समाजकल्याण या तीनही विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आत्तापासून काटेकोरपणे नियोजन करून, या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना कशाप्रकारे लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

दरम्यान, डीबीटी योजनेमध्ये सुसूत्रता यावी, लाभार्थ्यांना योग्य अनुदान मिळावे, कोणावरही अन्याय होवू नये, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी तीनही विभागांकडून पूर्व तयारी सुरू झाली आहे. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या वस्तूंचे मार्केट सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून कोणत्या वस्तूंचा नागरिकांना जास्त फायदा होवून शकतो. त्या वस्तूंची किंमत, वस्तूंची गुणवत्ता या सर्व गोष्टींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. हा सर्व्हे करण्यासाठी प्रत्येक विभागाकडून एक पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून हा सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल खरेदी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्या वस्तूंसाठी किती अनुदान द्यायचे हे ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषेतील अधिकाऱ्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)