गटविकास अधिकाऱ्यांना सूचना ः सुरज मांढरे यांची माहिती

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.11 – वैद्यक्तीक लाभाच्या योजनेचा (डीबीटी) लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील महिला आणि शेतकरी यांच्याकडून पंचायत समिती स्तरावरून अर्ज भरून देण्याचे काम सुरू आहे. परंतू, हे अर्ज भरताना काही महानग मदत करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.

दरम्यान, या तक्रारीची दखल घेऊन त्याची शहानिशा करण्यात येणार आहे. त्यामध्ये तथ्य आढळून आल्यास संबधीत व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

जिल्ह्यात डीबीटी अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. हे अर्ज जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून, अत्यंत सुटसुटीत हा अर्ज आहे. लाभार्थ्यांना तो भरण्यासाठी सोपा आहे. यावर्षी डीबीटीचे वेळापत्रक काटेकोरपणे तयार करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेसाठी पूर्वी शासकीय कार्यालयातून घेण्यात येणारी कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे या वर्षी बऱ्याचशा प्रतिज्ञापत्र, स्वघोषणापत्र जोडणे पुरेसे असल्याची तरतूद नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेली आहे.
असे असताना, जिल्ह्यात काही लोकांकडून या डीबीटीच्या नावाखाली एजंटगिरी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. लाभार्थी महिला किंवा शेतकरी यांनी अर्ज भरताना कोणालाही पैसे देऊ नये. पैसे कोणी मागितले किंवा पिळवणूक केली तर, त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. तसेच, अर्ज भरण्यात कोणाला मदतीची आवश्‍यकता असेल तर, ती मदत जिल्हा परिषदेच्या शाळेतील नववी आणि दहावीमधील मुलांकडून सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

——————–
यावर्षी डीबीटी योजनेचे वेळापत्रकानुसार काम सुरू आहे. त्यानुसार लाभार्थ्यांकडून अर्ज भरण्याच्या बहाण्याने कोणी पैसे घेत असतील किंवा त्यांची पिळवणूक करत असतील तर, त्या संबधीत व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करा. तसेच शेतकऱ्यांनीही अशा चुकीच्या गोष्टींना थारा न देता, तक्रार करावी.
– सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)