डीपीमधील फ्यूजसाठी चक्क शेतकऱ्यांकडून वर्गणी

माण तालुक्‍यात महावितरणच्या कारभाराचे रोज नवीन किस्से

म्हसवड – माण तालुक्‍यात सर्वत्र वीज वितरण कंपनीने उभारलेल्या डी.पी.मधील फ्युज हा संशोधनाचा विषय झाला आहे. आपली जबाबदारी झटकून फ्युज बदलण्यासाठी चक्क शेतकऱ्यांकडून वर्गणी गोळा करण्याचा पायंडा महावितरणचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी पाडला आहे. या वृत्तीमुळे तालुक्‍यात तीव्र संताप व्यक्त होत असून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महावितरणचे एकेक किस्से हा आता संशोधनाचा विषय बनू पाहत आहेत. कधी चुकीची बिले, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अरेरावी, कमी-जास्त विद्युत दाब असे एक ना अनेक प्रकारांमुळे ग्रामीण जनता हैराण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कृषिपंपांना तसेच सिंगल फेजद्वारे घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपणीने आवश्‍यक तेथे डीपी (रोहित्र) बसवली आहेत.

या रोहित्रांची क्षमता त्यावर आधारीत किती क्षमतेचे कृषिपंप जोडावयाचे आहेत, यावर ठरवली जात असते. पण सध्या रोहित्रांची क्षमतेपेक्षा कितीतरी पट अधिक कृषिपंपांना जोडणी दिली गेली आहे.त्यामुळे रोहित्रांमध्ये फ्युज जाणे, वायरिंग जळणे, डी. पी. जळणे असे प्रकार वारंवार घडत असतात.

जळालेले डी. पी. दुरुस्त करणे, वायरिंग बदलणे किंवा फ्युज बदलणे असो प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांकडून वर्गणी गोळा केली जाते. फ्युजा बदलून देणे, दुसरा डीपी आणून जोडणे, अगदी वाहतूक खर्च देणे, डीपी गाडीत भरणे, उतरवणे यासाठीही शेतकऱ्यांचाच पैशाच्या व शक्तीचा वापर केला जात आहे. अनेक गावात डीपींची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी फ्युज नावाचा प्रकारच नाही. थेट मोठ्या आकाराची तार जोडली जाते. त्यामुळे वीज प्रवाह जास्त झाला तर फ्युजऐवजी बसवलेली जाड तार न जळता कृषीपंप जळत आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकरी वर्गाला सोसावा लागत आहे.

महावितरण शेतकऱ्यांकडून बिलाशिवाय इतर अनेक प्रकारचे चार्जेस आकारते, पण फ्युजा बदलत नाही. सध्या वीज वितरणकडे कर्मचारीसंख्या कमी असल्याने फ्युजा बसवणे, जळलेले जंप बदलणे, डीपीमधील वायर्स बदलणे, यासारखी अनेक कामे खाजगी व्यक्तीकडून पैसे मोजून करुन घ्यावी लागत आहेत. तकलादू साहित्य वापरल्यामुळे काही ठिकाणी वायरमन जीवास मुकले आहेत. महावितरणने डीपींमधील फ्युजा तातडीने बदलाव्यात, तसेच यासाठी शेतकऱ्यांना भूर्दंड देवू नये, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)