डीजेच्या संपाला हवेलीतून पाठिंबा

लोणी काळभोर -सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या 65 डेसिबलच्या आवाजाच्या मर्यादेत ध्वनिक्षेपणाचे काम करणे शक्‍य नाही. त्यामुळे डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी पुणे शहर व पुणे ग्रामीण साउंड लाईट जनरेटर्स असोसिएशनने 11 ऑगस्टपासून संप पुकारला असून त्याला हवेली तालुका डीजे चालक मालक संघटनेने पाठींबा दिला असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश काळभोर यांनी दिली.
यामुळे 15 ऑगस्टची देशभक्तीपर गीते, त्याच दिवशी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या डीजेची धम्माल ऐकायला मिळणार नाही. सारे काही शांततेत-आवाजविरहित पार पडेल. यामुळे वर्षातून एकदाच होणाऱ्या या कार्यक्रमाच्या आनंदावर विरजण पडणार आहे. असे सांगत काळभोर म्हणाले देशभरातील 10 लाख लोकांचा पोटा-पाण्याचा व्यवसाय ‘साऊंड आणि लायटिंग’वर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी आवाजावर मर्यादा घालून दिली आहे. त्यात 65 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची मर्यादा ओलाडणाऱ्या साऊंड व लायटिंग व्यावसायिकावर पोलीस गुन्हे दाखल करतात. ही मर्यादा पाळत साऊंड सिस्टिम चालविणे शक्‍य नाही. सरकारने तर साऊंडचे परवाने देणे बंद केले आहे. अनेकांनी लाखो रुपये खर्च करुन साऊंड सिस्टिम खरेदी केली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात 350 पेक्षा जास्त साऊंड सिस्टिम चालविणारे व्यावसायिक आहेत. आवाजाच्या मर्यादेमुळे या व्यावसायिकांचे मरण ओढवले आहे.
आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नाही. तसेच आवाजाची मर्यादाही ओलांडायची नाही. सरकारने आवाजाच्या मर्यादेचा फेरविचार करावा. तसेच 65 डेसिबलच्या मर्यादेपेक्षा आमच्या व्यवसायाला आवश्‍यक असलेली आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी, अशी आमची मागणी आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 65 डेसिबलची मर्यादा दिली आहे; परंतु त्यांच्या मोजणीत शंका किंवा हा नियम माहित नसल्यामुळे चौकात असलेली डेसिबलची पातळी व मोजणी यात तफावत आढळून येते. सार्वजनिक कार्यक्रम किंवा जेथे ध्वनिक्षेपकाचा वापर होतो अशा कार्यक्रमात आवाजाची ही पातळी राखणे कठीण आहे.
साऊंड सिस्टिम चालविणारा तांत्रिक शिक्षण घेतलेला असतो. तो कलाकार असूनही पोलीस त्याच्याशी उद्धट वर्तन करतात. लाठी उगारतात. तसेच प्रसंगी त्याच्या साऊंड सिस्टिमचे नुकसान करतात. हा आमचा उद्योग आहे. पण पोलीस आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देतात. गैरवर्तन करतात. त्याचाही त्रास होतो.

  • याकडे मात्र दुर्लक्ष
    न्यायालयाने घेतलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवून देताना ते म्हणाले, जेव्हा दोन व्यक्ती परस्परांशी गप्पा मारतात तेव्हा त्याचीच पातळी अनेकदा 65 डेसिबलच्या मर्यादेपेक्षा जास्त असते. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव, दहिहंडीसह सर्वधर्मिय कार्यक्रमात ढोल – ताशा, बेंजो, डोलीबाजा आदींचा वापर केला जातो. त्याचा आवाज विहीत डेसिबलपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)