डीएसके यांच्या तीन नातेवाईकांनाही अटक

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : माहिती न दिल्याचा ठपका
पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या तीन नातेवाईकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. यामुळे डीएसके यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. डीएसके दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

केदार वांजपे, सई वांजपे आणि धनंजय पाचोर अशी अटक आरोपींची नाव आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके दाम्पत्याला पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली होती. त्यानंतर ते ससून व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. उपचारानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान त्यांनी केलेला जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला. नुकतीच त्यांच्या सर्व मालमत्तेच्या जप्तीचा आदेश नुकताच सरकारने काढला आहे. बुधवारी सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार वांजपे कुलकर्णी यांच्या भावाचे जावई आहेत. सई हिच्या नावावर कुलकर्णी यांनी जमीन खरेदी केली आहे. वांजपे दाम्पत्याला कुलकर्णी यांच्या व्यवहारांची माहिती आहे. गेल्या दहा वर्षांपासून कुलकर्णी यांच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी धनंजय पाचपोर हे जमिनीचे सर्व व्यवहार पाहत होते. कुलकर्णी यांच्या अनेक मोठ्या प्रकल्पांची माहिती पाचपोर यांना आहे. बुधवारी सायंकाळी पाचपोर आणि वांजपे दाम्पत्याला चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने बोलाविले होते. चौकशीत त्यांनी पोलिसांना पुरेशी माहिती दिली नाही. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी केदार कुलकर्णी यांच्याबरोबर काम करत होते. ड्रीमसिटीसाठी जमीन खरेदी करण्याची जबाबदारी केदार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. आर्थिक वाद झाल्याने 2009 मध्ये केदार यांनी कुलकर्णी यांच्यापासून फारकत घेतली. आर्थिक अडचणीत आल्यानंतर कुलकर्णी यांनी पत्रकारपरिषदेत स्वत:ची बाजू मांडली होती. त्यावेळी कुलकर्णी यांनी “नातेवाईकांनी अडचणीत आणले. केदार वांजपे यांनी विरोधकांना माहिती दिली,’ असा आरोप कुलकर्णी यांनी केला होता. वांजपे यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा अब्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले होते.

कुलकर्णी यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल होणार
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. विशेष न्यायालयात गुरूवारी (17 मे) कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)