डीएसके प्रकरण : महाबॅंकेच्या “त्या’ तीन अधिकाऱ्यांना जामीन

पुणे – रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या नियमाचे उल्लंघन करून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांनी कर्ज दिल्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी तिघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना बुधवारीच न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.

जामिनाबाबत पोलीस आणि सरकारी वकिलामध्ये असलेल्या मतभेदामुळे गुरुवारी उशिराने या अर्जावर युक्तीवाद झाला. त्यामुळे न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार शुक्रवारी बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांची तपासात सहकार्य करण्यासह इतर अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना बुधवारी काही अटी आणि शर्थींवर जामीन देण्यात आला. त्यामुळे समानतेच्या आधारावर गुप्ता, मुहनोत आणि देशपांडे या तीन अधिकाऱ्यांना जामीन मिळावा, म्हणून बचाव पक्षाचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी अर्ज केला होता. “संबंधित अधिकाऱ्यांकडील तपास पूर्ण झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या म्हणण्यात नमूद करण्यात केले आहे. सध्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच्या मुलाखतीसाठी गुप्ता यांना बोलविले जाणार आहे. त्यामुळे गुप्ता, मुहनोत, घाटपांडे यांना हा जामीन मंजूर करण्यात यावा,’ अशी विनंती ऍड. निंबाळकर यांनी न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, पोलिसांनी जामिनास हरकत नसल्याचे लेखी देऊनही विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला होता. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यात सदर अर्जदार आरोपींकडे कागदपत्रे दाखवून पुरेसा तपास करण्यात आलेला आहे. उपरोक्त कारणांचा विचार करत सदर जामीन अर्जावर न्यायाच्या दृष्टीने योग्य त्या अटी आणि शर्थींवर आदेश होण्यास विनंती आहे, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे जामिनाबाबत पोलीस आणि सरकारी वकिलांमध्येच ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले होते. या सर्व नाट्यमय घटामोडीनंतर तिघांनाही अखेर जामीन मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घाटपांडे आणि नेवसेकर यांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी
डीएसके यांचे चाटर्ड अकाऊंटंट (सीए) सुनील मधुकर घाटपांडे, डीएसके ग्रुपचे मुख्य अभियंता राजीव दुल्लभदास नेवसेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी (दि. 2 जुलै) रोजी सुनावणी होणार आहे. घाटपांडे यांच्या वतीने ऍड. एस. के. जैन आणि नेवसेकर यांच्याकडून ऍड. रोहन नहार यांनी जामीन अर्ज सादर केला आहे. सध्या दोन्ही आरोपी 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. “घाटपांडे यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये डीएसकेडीएलचे व्यवहार बेकायदेशीर असून पैशांचा वापर योग्य कारणांसाठी झालेला नसल्याचे नमूद केले आहे. तपासासाठी आवश्‍यक असलेले सर्व कागदपत्रे त्यांनी वेळोवेळी पोलिसांना दिले आहेत,’ असा युक्तीवाद ऍड. जैन यांनी घाटपांडेच्या वतीने केला. तर नेवसेकर यांचा या प्रकरणाची थेट संबंधनसून ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत. त्यांनी ठेविदारांना कोणतेही आमीष दाखवले नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा युक्तीवाद ऍड. नहार यांनी केला. दरम्यान याबाबत सरकारी पक्षाकडून सोमवारी ( 2 जुलै) आपले म्हणणे मांडण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जावर निकाल होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)