डीएसके दाम्पत्याविरोधात 37 हजार पानांचे आरोपपत्र

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल : 2,043 कोटी रुपयांचा घोटाळा


33 हजार गुंतवणुकदारांची फसवणुकीचा ठपका


6 हजार 792 जणांची आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार

पुणे – गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात गुरूवारी दोषारोपपत्र दाखल केले. ते तब्बल 36 हजार 875 पानांचे आहे. त्यामध्ये कुलकर्णी दाम्पत्याने 2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कुलकर्णी यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होते. त्यासाठी तज्ज्ञ सदनी लेखापालांची मदत घेण्यात आली होती. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी केलेल्या व्यवहारांची माहिती नमूद करण्यात आली आहे. कुलकर्णी यांची बॅंकखाती, कंपन्या, ठेवीदारांकडून गोळा केलेला पैशांचा अपहार कशा पद्धतीने केला याबाबतची कागदपत्रे दोषारोपपत्र जोडण्यात आली आहेत.
पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त नीलेश मोरे आणि त्यांच्या पथकाने दोषारोपपत्र तयार केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दोषारोपपत्र तयार करण्याचे काम वेगाने सुरू होते. सहाय्यक आयुक्त नीलेश मोरे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांचा जामीन विशेष न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे. आणखी सहा जणांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार यामध्ये पुरवणी आरोपपत्र देखील दाखल होणार असल्याचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी यावेळी सांगितले. भारतीय दंड संहिता कलम 420, 406,467,468,471, 411, 34, 120 (ब), महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पोलीस म्हणाले…
ड्रीमसिटीसाठी 477 कोटी 76 लाख रूपयांचे कर्ज सहा बॅंकामार्फत घेण्यात आले आहे. त्यापैकी केवळ 150 ते 175 कोटी खर्च झाल्याचे तपास अधिकारी मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या घोटाळ्याला 2010 पासून सुरूवात झाल्याचे ते म्हणाले. ज्या कारणासाठी कर्ज घेतले गेले. त्या पैशांचा वापर त्या कारणासाठी झाला नसल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. हा पैसा साडी खरेदी, चपला खरेदी, केटरींगसाठी अशा विविध गोष्टींसाठी खर्ची केल्याचेही मोरे यांनी सांगितले. हेमंती कुलकर्णी यांच्या बॅंक खात्यावरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाला आहे. मुलगा शिरीष याच्यावरही गुन्हा दाखल आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. इतर चौघांना अटक केली आहे.

 


 

अशी आहे घोटाळ्याची व्याप्ती
डीसकेंनी विविध 9 कंपन्यांच्या माध्यमातून नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचे आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल 33 हजार ठेवीदारांची फसवणूक झाली असल्याचे असून, त्यापैकी 6 हजार 792 नागरिकांच्या लेखी तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाल्या आहेत. आत्तापर्यंत झालेलया तपासात डीएसके उद्योग समुहाकडून ठेवी, कर्ज स्वरूपातील 1 हजार 83.7 कोटी, वित्तीय संस्था आणि बॅंक यांच्याकडून 711.36 कोटी रूपये, कर्जरोख्याद्वारे 111.35 कोटी आणि फुरसुंगी येथील जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या अपहाराद्वारे 136.77 कोटी असा एकूण 2 हजार 43 कोटी 18 लाखांचा घोटाळा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)