डीएसके दाम्पत्याचा जामीन फेटाळला

विशेष न्यायालयाचे आदेश : अजनूही दिलासा नाहीच 

पुणे – गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचे अमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांना आणि त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला. डीएसके यांनी वेगवेगळया कंपन्या स्थापन करताना त्या पब्लिक प्रा.लि. नावाने उभारल्या.त्याद्वारे भागधारकांकडून पैशांची उभारणी केली. त्यामुळे डीएसके कंपन्याचे खरे मालक नसून ते केवळ विश्‍वस्त असल्याने त्यांनी कंपनी फायद्याचे दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित होते.

मात्र, पदाचा गैरवापर करत त्यांनी भागधारकांचा पैसा वैयक्तिक कारणासाठी तसेच स्वत:चे आर्थिक फायद्याकरिता वापरला आहे. विविध कंपन्यांचे माध्यमातून डीएसके यांनी सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे तपासात आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. त्यांनी केलेला हा गंभीर गुन्हा असून त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी केली होती. न्यायालयाने वेळोवेळी मुदत देऊनही डीएसके 50 कोटी रुपये जमा करू शकले नाही.

तसेच त्यांनी वेळोवेळी न्यायालयाची दिशाभूल केली. अशी व्यक्ती जर जामिनावर सुटली तर ती काहीही करू शकते. तसेच त्यांची पळून जाण्याची शक्‍यता देखील नाकारता येत नसल्याचा युक्तीवाद ऍड. चव्हाण केला. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने डीएसके दाम्पत्याचा जामीन फेटाळला. बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकांत शिवदे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)