डिलिव्हरी बॉयनेच चोरले 5 किलो सोने

फिर्यादीच निघाला आरोपी


रविवार पेठेतील समृद्धी ज्वेलर्स चोरीप्रकरण

पुणे – रविवार पेठेतील समृद्धी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून 1 कोटी 35 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज चोरला. असा बनाव करणारा फिर्यादीच आरोपी असल्याचा प्रकार हिंजवडी पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

याप्रकरणी तिघांनाही मुंबईमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यानेच हा बनाव रचल्याचे कबूल केले. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईमधून फिर्यादीच्या मित्र आणि नातेवाईकांकडून 4 किलो 900 ग्रॅम सोने जप्त केले. तसेच, पाच किलो चांदीही जप्त केली. फिर्यादीत मात्र चांदी चोरी केल्याची तक्रार त्याने नोंदवली नव्हती.

याप्रकरणी फिर्यादी आणि आरोपी डिलिव्हरी बॉय बेहराराम शांताराम पुरोहित (वय 31, रा. टिंबर मार्केट.) यांच्यासह किशोर लक्षण रावल (28, रा. नालासोपारा, मुंबई.) व नरेश जयरुपजी रावल (21, रा.भाईंदर, तिघेही मूळ राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे.
घटनेनंतर फिर्याद दाखल करण्यासाठी बेहराराम पुरोहित याला लागलेला वेळ आणि तो देत असलेली माहिती यामध्ये तफावत आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी त्यानेच सोने मुंबई येथे आपल्या मित्र व नातेवाईकांकडे लपवल्याचे सांगितले. त्याने मित्र किशोर रावल व नरेश रावल यांच्या मदतीने कट रचला होता. झव्हेरी बाजार येथून घेतलेले सोन्याची बिस्किटे व चांदी त्याने किशोर रावल याच्याकडे ठेवली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या दोघाही साथीदारांना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सीताराम मोरे, राजेंद्र कदम, रघुनाथ जाधव, निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुळे, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक आर. बी. उंडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, वनिता धुमाळ, देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काय घडली मूळ घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेहराराम पुरोहित रविवार पेठेमधील समृद्धी ज्वेलर्स दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. मालक अरविंद सरेमल चोप्रा यांच्या सांगण्यावरून पुरोहित मुंबईमधील जव्हेरी बाजारमधून अरिहंत ज्वेलर्स आणि नम्रता ज्वेलर्स या दुकानांमधून 100 ग्रॅम वजनाची 45 बिस्किटे घेऊन पुण्याकडे निघाला होता. मात्र, त्याने सोन्याची बिस्किटे पुण्याकडे न आणता ती मुंबईमध्ये आपल्या नातेवाईक व मित्रांकडे ठेवली. पुण्यात बालेवाडी स्टेडियमजवळ आल्यानंतर तिघांनी त्याला चाकूचा धाक दाखवून सोने चोरल्याचा बनाव करून हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)