डिजिटल सोल्युशन शेतीसाठी वरदान – उपराष्ट्रपती

आयआयटी मुंबईच्या हिरक महोत्सवानिमित्त ‘शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ

मुंबई: हवामान आधारित शेतीसाठी सॅटेलाईट व आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन दुप्पट करतानाच खर्च कमी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. डिजिटल सोल्युशन शेतीसाठी वरदान ठरू शकते. शाश्वत शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवई येथील आयआयटी मुंबईच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त ‘शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘सर्वांना नमस्कार’ असे म्हणत उपराष्ट्रपतींनी भाषणाची मराठीतून सुरूवात केली. आपल्या मातृभाषेचा आदर करा, असेही त्यांनी सांगितले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मला शेतीच्या प्रश्नांची जाण आहे, असे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की, शेतीच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी एएफआयटीए आणि डब्ल्यूसीसीए या दोन आंतराराष्ट्रीय संस्थांनी एकत्र येऊन या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे ही कौतुकास्पद बाब आहे.

एम. व्यंकय्या नायडू यावेळी म्हणाले, शिक्षकाला आपला मुलगा शिक्षक व्हावा असे वाटते. डॉक्टरला आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी इच्छा असते. मात्र शेतकऱ्याला आपला मुलगा शेतकरी व्हावा असे वाटत नाही त्याला शेती क्षेत्रातील अनियमितता कारणीभूत आहे. देशातील शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा त्यावर परिणाम होत असतो, अशा विचित्र परिस्थितीत पीक घेण्यासाठी खर्च वाढतो आणि त्या तुलनेने उत्पादन अल्प येते. म्हणून शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे. शेतीचे उत्पादन दुप्पट करतानाच त्यावरील खर्च कमी करता आला पाहिजे. सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.

तंत्रज्ञानावर आधारित शेती करताना शेतकऱ्यांना हवामान, आधुनिक पीक पद्धती याबाबत अचूक माहिती व मार्गदर्शनाची गरज आहे. मोबाईलचा वापर त्याचबरोबर पीक पाहणीसाठी ड्रोनचा वापर फायदेशीर ठरत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘प्रत्येक थेंबात जास्त उत्पादन’ ही दुसरी हरितक्रांती ठरेल अशा विश्वासही नायडू यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)