डिजिटल सुरक्षा कशी मिळवणार? (भाग- १ )

डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रवास करताना भारतीयांची व्यक्तिगत माहिती मात्र सुरक्षित नसल्याचे विदारक सत्य वारंवार समोर येत आहे. डेटाचोरी रोखण्यासाठी ना सक्षम यंत्रणा, ना ठोस कायदे. वेगवेगळ्या मार्गांनी आपली व्यक्तिगत माहिती संकलित केली जात असून, तिचा अधिकृत आणि अनधिकृत वापर केला जाण्याच्या शक्‍यता वाढत आहेत. दुसरीकडे, खासगीपणाबद्दल भारतीय फारसे जागरूक नसल्याने माहितीची चोरी सर्रास होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डिजिटल साक्षर बनण्याबरोबरच चोरी रोखण्याचे उपायही समजून घेणे गरजेचे बनले आहे.

केंब्रिज ऍनालिटिकाने फेसबुकवरील डेटा घेऊन त्याचे मानसशास्त्रीय विश्‍लेषण केले आणि त्याचा राजकीय, व्यावसायिक कारणांसाठी वापर केला. संपूर्ण जगभरात हा विषय चर्चेचा बनला आहे. डेटा सुरक्षित कसा राहील, व्यक्तिगत माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार अशा विषयांवर खूप लिहिले-बोलले जात आहे. चारच महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीनेही सांगितले होते की, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर लोकांचा व्यक्तिगत डाटा गोळा केला जात आहे आणि त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जात आहे.

आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि हस्तक्षेप वाढत चालला असून, अनेक सेवा आणि घडामोडी परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. आपल्याबद्दलची कोणती, किती माहिती कोणत्या मार्गाने एकत्रित केली जाते आणि त्याचा अवैध, अनैतिक संग्रह करून वापर केला जातो, ती कशी विकली जाते, याची माहिती करून घेणे आणि अशा प्रकारांना खतपाणी न घालणे या बाबी अत्यावश्‍यक बनल्या आहेत. व्यक्तिगत माहितीची सुरक्षितता, ती नष्ट किंवा निर्माण करण्याविषयीचे मूलभूत ज्ञान सर्वांनी घेणे गरजेचे बनले आहे.

आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे ऍप उपलब्ध आहे. धडाधड ऍप डाउनलोड करताना आपण त्यांनी विचारलेली माहिती बेधडक देऊन टाकतो. अनेक प्रकारची बिले इंटरनेटवरून भरतो. या सर्व माध्यमातून माहितीचे “उत्पादन’ प्रचंड प्रमाणात होत आहे. दोन व्यक्ती मोबाइलवरून बोलत असतील, तर ते संभाषणही कुठे ना कुठे रेकॉर्ड होत असते. आपण जे मेसेज पाठवतो, तेही रेकॉर्ड होत असतात. जेव्हा आपण एखादे ऍप डाउनलोड करतो, तेव्हा आपल्याला अनेक प्रकारची माहिती विचारली जाते. म्हणजेच, मोबाइलचा जेवढा अधिक वापर आपण करू, तेवढा आपल्या खासगी माहितीचा साठा होत असतो.

जर “रूट फाइंडर’ किंवा “नेव्हिगेशन’ ऍपचा आपण वापर करीत असू, तर आपण कोणत्या वेळी कुठे आहोत, काय सर्च करीत आहोत हेही अनेकांना समजत असते. सोशल मीडियावर आपण काय “लाइक’ आणि “शेअर’ करतो, कोणता फोटो किती वेळ पाहतो, याच्याही नोंदी होत असतात.

एखादे ऍप डाउनलोड करताना आपल्याला किमान माहिती विचारली जाते आणि ती दिल्याखेरीज ऍप डाउनलोड होऊ शकणार नाही, असे सांगितले जाते. नाइलाजाने आपण ती माहिती देऊन टाकतो. एखाद्या ऍपचा ऑपरेटर जर आपल्याला कॉन्टॅक्‍ट लिस्ट मागत असेल, तर आपल्याला हा प्रश्‍न पडत नाही की, अखेर आपल्या कॉन्टॅक्‍ट लिस्टची या ऑपरेटरला का गरज पडली? म्हणजेच, आपण जी माहिती देतो, त्याचा संग्रह होत असतो. ही अशी चूक आहे, जी आपण रोज करतो आणि आपल्या व्यक्तिगत माहितीचा साठा करण्याची संधी कुणालातरी देतो.

आपला डेटा एकत्रित करून कोणी आपली प्रोफाइल बनवत आहे आणि आपण ही प्रक्रिया रोखू शकत नाही. त्याचा आपल्याला खूप त्रास होणार आहे, आपल्या मूडप्रमाणे काही गोष्टी निश्‍चित केल्या जात आहेत, याचाही आपल्याला पत्ता लागत नाही. आपला मूड ओळखून आपल्याकडून मिळविलेल्या माहितीचा गैरवापर करण्यास सुरुवात होते. आपले मत बनविण्यापर्यंत मजल जाते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान हिलरी क्‍लिंटन यांच्या समर्थकांना फेसबुकवरून एक मेसेज पाठविण्यात आला.

मतदानासाठी तुम्हाला मतदान केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही वेबसाइटवरूनही मतदान करू शकता, अशा आशयाचा हा मेसेज होता. ती वेबसाइट बनावट होती, हे नंतर स्पष्ट झाले. जर लोकांनी खरोखर वेबसाइटवरून मतदान केले असते, तर त्यांचे मत वाया गेले असते. माहितीचा असा वापर होणे अत्यंत घातक आहे.

अशाच प्रकारे दोन समुदायांना एकमेकांविरुद्ध चिथावणी देण्यासाठी “फेक न्यूज’ म्हणजेच बनावट बातम्या पसरविल्या जातात. अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत माहितीची निर्मिती कमी करणे आणि निर्मित झालेली माहिती नष्ट करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्‍यक आहे. आपल्याच माहितीचा आपल्याच विरोधात एखाद्या हत्यारासारखा वापर होऊ नये असे वाटत असल्यास हे केलेच पाहिजे.

महेश कोळी
संगणक अभियंता


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)