डिजिटल दिव्यांच्या सुशोभिकरणावर “पावसाचे पाणी’

डिजिटल कर्व्हज महागडे : यापुढे प्रयोग न करण्याचा निर्णय

पुणे – दुभाजक आणि रस्त्याच्या कडेला पदपथाच्या कडेला डिजिटल दिव्यांचा (कर्व्हज) प्रयोग “फेल’ होण्याची चिन्हे असून, पाऊस पडल्याने हे दिवे बंद पडत असल्याचे प्रकार घडत आहेत. दिवे लावण्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च तर झाला आहेच, परंतु विजेचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे हा खर्च वाढत असल्याने अन्यत्र हा प्रयोग केला जाणार नाही, असे ठरवण्यात आल्याचे पुणे महापालिकेच्या पथविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गंगाधाम चौक तसेच सॅलसबरी पार्क परिसरातील रस्त्यांवर डिजिटल कर्व्हजचा हा प्रयोग महापालिकेने राबविला आहे. गंगाधाम चौकातून आई माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता दुभाजकाभोवती निळे आणि पांढरे डिजिटल कर्व्हज बसविण्यात आले आहेत. तसेच सॅलसबरी पार्क येथे नेहरू रस्त्याच्या कडेला पदपथाबाजूला हे कर्व्हज बसविण्यात आले आहेत. रात्री यातील दिवे लावण्यात येतात. वाहनचालकांना दुभाजक आणि पदपथांचा अंदाज यावा, यासाठी एलईडी दिवे या कर्व्हजमध्ये बसविण्यात आले आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर बसविलेल्या या दिव्यांसाठी कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. हे काम अजूनही सुरूच आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी हे दिवे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथील डिजिटल कर्व्हजमध्ये पाणी गेल्याने काही दिवे नादुरुस्त झाले आहेत. पूर्वी दुभाजक असल्याचे वाहनचालकांना समजावे यासाठी रेडियम, रिफ्लेक्‍टर्स लावले जात होते. या खर्चापेक्षा डिजिटल कर्व्हज महागडे आणि मेन्टेनन्सही खर्चिक असल्याने हा प्रयोग पुढे न राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पथ विभागाच्या या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

नेहरू रस्त्यावरील उड्डाणपुलाचे कामही अनियोजित
नेहरू रस्त्यावर अप्सरा थिएटर ते वखार महामंडळ चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम सुरू असून पुलाच्या मार्गात येणाऱ्या गिरीधर भवन चौक आणि डायस प्लॉट चौक येथे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. सुमारे अर्धा कि.मी.च्या पुलासाठी चौकांतूनच पिलरच्या कामाला सुरूवात केली आहे. वास्तविक या रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने चौकांच्या मधल्या टप्प्यांमधील पिलरचे कामाला प्राथमिकता देऊन शेवटच्या टप्प्यात चौकांमधील पिलरचे काम हाती घेणे गरजेचे होते. चौकांपासूनच पिलरसाठी खड्डे खोदाई केल्याने येथील बॅरिकेडसमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या चुकीमुळेच दोन दिवसांपूर्वी गिरीधर भवन चौकात संदीप शहा या दुचाकीचालकाचा अपघाती मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. हा उड्डाणपूल येथील वाहतूक समस्येत भर घालणारा ठरणार असून, त्याचा विस्तार गंगाधाम चौकापर्यंत करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसोबतच पूना मर्चंट चेंबरनेही केली आहे. यावर महापालिका काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)