डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे

तळेघर-आंबेगाव तालुक्‍याच्या पश्चिम आदिवासी अति दुर्गम भागातील परिसरामध्ये असणाऱ्या व पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे झपाट्याने कोरडे झाले आहे.
डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे यावर्षी या भागामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहत होते. यामुळे या परिसरातील; पाटण म्हाळुंगे कुशिरे खुर्द, मंगोली, भेंडारवाडी, कोलतावडे ही गावे ओलिताखाली येऊन या भागातील शेतकरी या पाणलोट क्षेत्राखाली उपसा सिंचनाद्वारे मोट्या प्रमाणात रब्बी पिके घेऊ लागली. या पाणलोट क्षेत्रामुळे आदिवासी शेतकरी पाणी उपसा सिंचनाद्वारे गहू, बाजरी, बटाटा, मेथी, कांदा इतर मोठ्या प्रमाणात पिके घेऊ लागला. गतवर्षीपेक्षा यावर्षी वरूणराजाने लवकरच काढता पाय घेतल्यामुळे यावर्षी लवकरच डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे. आंबेगाव तालुकाच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर भागातील व पाटण खोरे मुसळधार पावसाचे माहेरघर समजले जाते. पावसाळ्यातील चार महिने या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या जनतेला सूर्य व चंद्राचेही दर्शन लवकर होत नाही. चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण कारवी लागते. वर्षानुवर्षे लोकांना दुष्काळाचे हाल सोसावे लागत आहेत. या भागातील मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डिंभे (बाबू गेनू जलाशय) धरणाचा फुगवटा हा मोठया प्रमाणात भरतो त्याचप्रमाणे या पाणलोट क्षेत्रात अनेक खोऱ्यांमध्ये छोटछोट्या व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडवले जाते. डोंगर माथ्यावरून येणारे पाणी या बंधाऱ्यात अडवले जाते. मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाई ही ठरलेलीच आहे.

  • उपसा सिंचन योजना राबवावी
    आंबेगाव तालुक्‍याचा पश्चिम पट्टा हा आदिवासी जनतेच्या उशाला असणाऱ्या डिंभे जलाशयावर अवलंबून असला तरी सावरली, साकेरी, पाटण, दिगद खोऱ्यातील जनतेला आजही घशाला कोरड पडलेली आहे. पाणलोट क्षेत्रामुळे आदिवासी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी या भागात उपसा जलसिंचन योजना लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी या भागतील आदीवासी जनतेची मागणी आहे. जरी धरणाचे पाणलोट क्षेत्र हे अनेक खोऱ्यानी विभागले असले तरी आजही पाटण, बोरघर, आसाणे, साकेरी, सावरली, कुशिरे या भागातील आदिवासी गावांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी आजही या भागातील लोकांना दऱ्या खोऱ्यात खडक टाकीतून किंवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळमिश्रीत पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. यामुळे आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)