डिंभा उजव्या कालव्यातून पाणी मिळावे

दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील 10 गावांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही सरकारकडून मात्र जनावरांच्या चारा छावण्या, पिण्यासाठी पाणी, रोजगार हमी योजना इत्यादी कामे सुरू नाहीत.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.याबाबतचे लेखी निवेदन शेतकऱ्यांनी मंचर येथील प्रांत अधिकारी अजित देशमुख यांच्याकडे सोमवारी (दि.12) दिले.
यावर्षी पाऊस न झाल्यामुळे लोणी, धामणी परिसरात विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडले असून यावरील विद्युत पंप सुरूच झाले नाहीत, तरी देखील हॉर्सपॉवरप्रमाणे वीजबिले आकारली जातात. ती पूर्णपणे माफ करावीत. अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्याचा मुबलक पुरवठा करावा. आंबेगाव तालुक्‍याला वरदान ठरलेल्या डिंभा धरणाचे पाणी या गावातील शेतीला मिळावे, अशी अनेक दिवसांपासूनची शेतकऱ्यांची मागणी आहे,ती पूर्ण व्हावी, अशी मागणी पोंदेवाडीचे सरंपच आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे. लोणी,धामणी,शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर, मांदळवाडी, वाळुंजनगर, रानमळा, खडकवाडी या गावांतील शेतीला डिंभा धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा करावा. शिरदाळे गावाला उपसाजलसिंचन योजना राबवावी. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, यावर्षी पावसाअभावी रब्बी आणि खरिपाची पिके घेता आली नाहीत, त्यामुळे या भागातील शेतकरी संकटात असून, शेतीसाठी आणि शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेली कर्जे माफ करावी, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान वाघ यांनी केली आहे. याबरोबरच शेतपट्टी आणि विद्यार्थ्यांची फी पूर्णपणे माफ करावी. रोजगार हमीची कामे सुरू करून रोजंदारास 500 रुपये रोजंदारी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, बाळशिराम वाळुंज, खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान वाघ, सचिन जाधव, मनोज तांबे, लोणी गावच्या सरपंच ऊर्मिला धुमाळ, रानमळा सरपंच राजेंद्र सिनलकर, पहाडदरा सरपंच संतोष कुरकुटे, शरद बॅंकेचे संचालक अशोक आदक पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)