“डास उत्पत्ती’ त सांगवी आघाडीवर

पिंपरी – शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण आढळू लागले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आजार पसरणाऱ्या डासांचा उपद्रव शहरात वाढू लागतो. परंतु यावर्षी जलपर्णीमुळे ऑक्‍टोबर महिन्यापासून डासांचा उपद्रव आणि आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने शहरातील प्रत्येक ठिकाणी निरीक्षण आणि परिक्षण केले. या परिक्षण अहवालानुसार नदी प्रदूषण, जलपर्णी आणि डास उत्पत्तीमध्ये सांगवी परिसर सर्वांत पुढे आहे.

समितीने 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरला दापोडी, सांगवी, पिंपरी, काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी पवना नदी परिसर, देहू, आळंदी, इंद्रायणी नदी परिसर, प्राधिकरण, चिंचवडगाव, पिंपरी, आकुर्डी, रावेत, नेहरूनगर, पिंपळे-सौदागर, सांगवी, दापोडी परिसरातील खासगी, सरकारी दवाखाने व रुग्णालये यांची पाहाणी केली. अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयवंत श्रीखंडे, पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत, अर्चना घाळी, ऍड. विद्या शिंदे, गौरी सरोदे,विभावरी इंगळे, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, राम सुर्वे, मंगेश घाग, अजय घाडी, सतीश मांडवे, समीर चिले, अमोल कानू, जयेंद्र मकवाना, बळीराम शेवते, विजय जगताप, राजेश बाबर, तेजस सापरिया, कपिल पवार, रामेश्वर गोहिल, सतीश मांडवे, अमृत महाजनी, उद्धव कुंभार, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले निरीक्षण पथकात होते. पथकाने काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली.

डासांसाठी जलपर्णी तयार करते उत्तम चेंबर
जलपर्णी (इकॉर्निया क्रासिप्स) ही पान वनस्पती हिवाळ्यामध्ये म्हणजेच सप्टेंबरपासून नदीचे पात्र व्यापून टाकण्यात तत्पर आढळली. जल प्रदूषण व जलपर्णी यांचे घट्ट नाते असते. सदरची वनस्पती प्रदूषित आहारावर जगत असते. जिथे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण तिथे हमखास जलपर्णी मोठ्या प्रमाणात दिसून आली. डासांसारख्या कीटकांच्या पैदाशीसाठी जलपर्णी उत्तम चेंबर निर्मितीचे कार्य शहरात करीत आहेत. जलपर्णी ही पवना व इंद्रायणी नदीतील ऑक्‍सिजन शोषून घेत असल्याचे निदर्शनास आले.

सोळा हजारांहून अधिक रुग्ण
परिक्षणात शहरातील दवाखाने आणि रुग्णालयांची सप्टेंबर, ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांतील ताप, डेंगू आणि मलेरिया संदर्भातील रुग्णांची आकडेवारी 16000 च्या पुढे गेलेली आढळली. नदी किनारीची उपनगरे दापोडी, सांगवीगाव परिसर, पिंपरी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, रावेत, आळंदी, देहू या ठिकाणी रुग्णांचे प्रमाण दुप्पट आढळले.

अशी आहे क्रमवारी
सर्वात जास्त डास निर्मितीचे ठिकाण सांगवी परिसरात दिसून आले आणि सर्वात कमी वाल्हेकरवाडी नदी परिसरात आहे. दोन नंबरला दापोडी, तीन नंबरला आळंदी, चार नंबरला थेरगाव, पाच नंबरला पिंपरी, सहा नंबरला चिंचवड गाव, सात नंबरला देहू आठ नंबरला रावेत परिसर आहे. अस्वच्छता व जलपर्णी प्रमाण हे डास निर्मितीचे निकष म्हणून पाहण्यात आले. जलपर्णी हटवताना किंवा यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने नदी पात्र साफ करताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी, ठेकेदार कोठेही आढळून आले नाही.

उपचार करणे अत्यंत गरजेचे
साथीच्या आजारांमध्ये नोव्हेंबर महिन्यात कमालीची वाढ दिसून आली. सप्टेंबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात 7500 पेक्षा जास्त रुग्ण ताप, डेंगू व मलेरियाने रुग्णालयात भरती झालेले आढळले. या वेळेस उपाय-योजना करणे अतिशय गरजेचे आहे. प्रशासनाने या बाबी गांभीर्याने घेतल्या नाहीत, तर डिसेंबर अखेरीस डेंगू व मलेरिया रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्‍यता आहे. या बाबींचा विचार केला असता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा महत्वाचा निष्कर्ष हाच आहे की, शहरातील डास उत्पत्तीचे प्रमुख चेंबर म्हणजेच जलपर्णी युक्‍त नदी ही तातडीने जलपर्णी मुक्‍त करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी परदेशातून कमी किमतीची यंत्र सामुग्री तातडीने मागवता येऊ शकेल.त्याचप्रमाणे साथीचे रोग कमी करण्याकरिता परिसरात औषध तसेच पावडर, धूर फवारणी मोठ्या प्रमाणात आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)