डासांनी “फोडले’…!

जलपर्णी फोफावल्याचा परिणाम : शहरवासियांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपरी – नदीपात्रात थेट सोडले जाणारे सांडपाणी, फोफावलेली जलपर्णी, अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात डासांचा उपद्रव वाढला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासियांना डास देखील फोडून काढत असल्याने असह्यता वाढत आहे. डासांमुळे रात्री समाधानाची झोपही होत नाही. नदीपात्रालगतच्या रहिवाश्‍यांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षानंतर डासांचा असा त्रास सहन करावा लागत असल्याचा संताप नदीकाठचे रहिवासी व्यक्त करत आहेत. साथीच्या आजारांचा शहरात फैलाव होत असून महापालिका कधी जागी होणार, असा सवाल नागरीक करत आहेत.

शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. शहरात सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत जलपर्णीमुक्त अभियान हातात घेतले आहे. दर रविवारी हे अभियान राबवून नदीपात्रातील जलपर्णी हटवली जाते. परंतु, वेळीच जलपर्णी काढली न गेल्याने ती नियंत्रणात आणणे अशक्‍य झाले आहे. महापालिकेने जलपर्णी काढण्यासाठी गतवर्षी सुमारे 37 लाख रुपये खर्चाची निविदा प्रसिध्द केली होती. मात्र, बहुसंख्य भागातील जलपर्णीला ठेकेदाराने हातही लावला नाही. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने जलपर्णी वाहून गेली. मात्र, ती नदीपात्रातच पूल, नदीपात्रालगतची झाडे आदी अडथळ्यांना अडकली. परिणामी जलपर्णीचे बीज नदीपात्रात कायम राहिले.

ऑक्‍टोबर हीट जलपर्णी वाढीसाठी पोषक मानली जाते. या कालावधीत नदीपात्रात पुन्हा जलपर्णी वाढली. त्याहीवेळी जलपर्णी काढण्यासाठी हलचाली झाल्या नाहीत. परिणामी आता नदीपात्रात पुन्हा जलपर्णी फोफावली आहे. त्यातच उन्हामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. बहुसंख्य भागात ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी, त्यावर फोफावलेली जलपर्णी आणि उन्हाची तीव्रता यामुळे नदीपात्रालगतच्या रहिवाशांना उग्र स्वरुपाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दिवसं-रात्रं डासांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. महापालिकेकडून धुरीकरण केले जाते. मात्र, डास त्याला दाद देत नाहीत. धुरीकरण झाल्यानंतर काही वेळातच पुन्हा डास चावा घेतात.

अंधार पडू लागताच डासांचे थवेच्या थवे नदीपात्रालगतच्या वस्तीत शिरतात. निगडी प्राधिकरण, चिंचवड, सांगवी, काळेवाडी आदी भागातील नदीपात्रालगतच्या रहिवाशी अक्षरशः ऐन गर्मीतही हात-पाय पुर्ण झाकतील असे कपडे, तोंडाला रुमाल बांधून फिरताना दिसतात. दुकानदार, फेरीवाले डास हटवण्यात व्यस्त असल्याचे पहायला मिळत आहे. डास चावून आजार होण्याच्या भितीने नदीपात्रालगतच्या भागातील लहान मुलांना पालकांनी खेळण्यासाठी घराबाहेर पाठवणे बंद केले आहे. दिवसभर उन्हामुळे बाहेर खेळायला भेटत नसताना सायंकाळीही डासांमुळे घराबाहेर पडता येत नसल्याने बालचमूंची अक्षरशः कोंडी होत आहे. नागरिकांनी सायंकाळच्या वेळी उद्यानांमध्ये फिरणे, रात्रीची शतपावली देखील बंद केली आहे. रात्रीही डासांमुळे नागरिकांची झोपमोड होते. आधीच उकाड्याने झोपेचे खोबरे होत असताना त्यात डासही सर्वांगावर तुटून पडत असल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना जगणे असह्य झाले आहे.

मच्छर अगरबत्ती मोफत द्या
नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे डासांमुळे जगणे असहय्य झाले आहे. महापालिकेने या रहिवाशांना डास मारण्यासाठी अगरबत्ती व बॅट मोफत द्यावी, अशी मागणी उपरोधिक मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. महापालिकेचे कर्मचारी वरवर औषध फवारणी करतात. या औषध फवारणीचा डासांवर काहीही उपयोग होत नाही. महापालिकेच्या निष्क्रीय कारभारामुळे नदीपात्रात जलपर्णी फोफावली आहे. परिणामी डासांचा उपद्रव वाढला आहे. शहरवासियांना डासांची भेट देणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता डास मारण्यासाठी अगरबत्ती व बॅट मोफत द्यावी, असे संजय गायके यांनी म्हटले आहे.

ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
पवना, मुळा व इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामासाठी महापालिकेने 10 मे 2017 ते 9 मे 2018 या एक वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रसिध्द केली होती. मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सध्या तिन्ही नदीपात्राला लॉन्सचे स्वरुप आले आहे. आरोग्य विभागाने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीसही बजावली. मात्र, ठेकेदाराने त्याला कोणतीही दाद दिली नसल्याचे फोफावलेल्या जलपर्णीमुळे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्येच जलपर्णी हटवणे गरजेचे होते. मात्र, ती काढली न गेल्याने आता जलपर्णी नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असून ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे, अशी मागणी मनसेचे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

हॅरीस ब्रीजचे काम सुरु असल्यामुळे येथील बंधारा काढण्याचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रवाहीत होण्यास अडचण असल्याने यावेळी जलपर्णी वाढीच्या व परिणामी डासांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, सांगवीमध्ये सध्या जास्तीचे मनुष्यबळ लावून जलपर्णी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. धुरीकरण ही वाढवले आहे. त्यामुळे लवकरच या तक्रारी कमी होतील.
– मनोज लोणकर, सहायक आयुक्‍त, आरोग्य विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)