डावपेचांचा रंगलेला ‘बाजार’ 

मागील कांही महिन्यातील हिंदी चित्रपटांची यादी बघितली तर अनेक विषयांची विविधाता दिसते, यामध्ये अंधाधुन, तुंबाड, बधाई हो, स्त्री अशा चित्रपटांचा समावेश होतो. या मध्ये सैफ आली खानच्या ‘बाजार’चा सुद्धा आता समावेश करावा लागेल. दिग्दर्शक गौरव चावला याने आपल्या पहिल्याच चित्रपटातून एक वेगळा विषाय उत्तम हाताळला आहे, ‘सॅक्रेड गेम’ या वेबसिरीज नंतर पुन्हा एकाद राधिका आपटे आणि सैफ एकत्र काम करताना दिसले आहेत.

‘बाजार’ची कथा शकून कोठारी (सैफ अली खान) आणि  उत्तर भारतातल्या एका छोट्या गावातून मुंबईत आपली स्वप्न पूर्ण करण्यास आलेल्या रिझवान (रोहन विनोद मेहरा) यांच्या भोवती गुंफण्यात आली आहे. शकून कोठारी प्रस्थापित बिजनेस टायकून आहे, तर स्मार्टनेस आणि हुशारी ठासून भरलेल्या रिझवानला मोठं व्हायच आहे, खूप पैसे कमवायचेत. शेअर मार्केट मधील हुकमी पान असलेल्या शकुन कोठारीला भेटण्याची, त्याच्या सोबत काम करण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे. शकुनकडे काम करायला मिळावं म्हणून धडपडतो. त्याची धडपड पुढे त्याला कुठे नेते.. स्टाॅक एक्स्चेंजमध्ये चालणारे व्यवहार, तिथले ताण.. राजकारण हे जवळून पाहताना त्याचे पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी ‘बाजार’ बघायला हवा.

दिग्दर्शक गौरव चावलाने आपल्या चित्रपटात नाटकात असतो तसा एक सूत्रधार वापरला आहे. नाटकात कसा नायकच भूमिकेतून बाहेर येत, सूत्रसंचालकाची भूमिका बजावतो आणि गोष्ट पुढे नेतो, तशाप्रकारे यातही रिझवान आवश्यक असेल तेव्हा, भूमिकेतून बाहेर येत प्रेक्षकांशी संवाद साधतो. दिग्दर्शकाने मुंबई शेअर मार्केटची पार्श्वभूमी निवडत तिथला व्यापार, बाजार आणि आर्थिक घडामोडीमध्ये पैशावरून मांडले जाणारे डाव, प्रतिडाव उत्तम सादर केले आहेत. निखिल आडवानी याचं लेखन तसेच संवाद या जमेच्या बाजू आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर सैफ अली खान याचा अभिनय ही अत्यंत महत्वाची बाब ठरली आहे. शकुन कोठारी साकारताना, त्याने त्याचा डौल आणि त्याचं अत्यंत व्यवहारी असणं याचा समतोल साधत भूमिका वठवली आहे. अनेक प्रसंगांमध्ये सैफ भाव खाऊन जातो. या चित्रपटातून दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरा बॉलीवूड मध्ये पदार्पण करतो आहे. येत्या काळात त्याच्याकडून आणखी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. यासोबत चित्रांगदा सिंग, राधिका आपटे यांच्याही भूमिका आहेत, राधिका आपटेच्या वाट्याला मात्र फार कांही आलेले नाही, चित्रपटाच्या तांत्रिक बाजू उत्तम आहेत, संगीताबद्दल सांगायचे तर केम छो मजामा.. हे गाणं बरं आहे. इतर गाणी लक्षात राहत नाहीत. ‘बाजार’ बद्दल थोडक्यांत सांगायचे तर नवा विषय आणि कलाकारांचा नेटका अभिनय यामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो. शेवट अधिक रंजक करता आला असता किंवा लांबी काहीशी टाळली असती तर चित्रपट अधिक प्रभावी झाला असता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तरीही मार्केट मधील वेगावान घडामोडींवर भाष्य कारणारा, डावपेचांचा रंगलेला ‘बाजार’ एकदा बघायला हरकत नाही.

चित्रपट – बाजार 
निर्मिती – निखिल आडवाणी, मधु जी, मोनिशा आडवाणी 
दिग्दर्शक – गौरव चावला 
संगीत – हनी सिंग, बिलाल सईद,जमील अहमद 
कलाकार – सैफ अली खान, राधिका आपटे, चित्रांगदा सिंग, रोहन मेहरा 
रेटिंग – ***

– भूपाल पंडित 
pbhupal358@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)