डाळिंब प्रक्रियायुक्‍त पदार्थांचा ब्रॅंड तयार करा 

कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा यांचे बागायतदार संघाला आवाहन : कृषी विद्यापीठात चर्चासत्र

राहुरी विद्यापीठ – डाळिंब फळ पिकाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावले आहे. डाळिंबाखालील क्षेत्र राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण, तेलकट डाग या रोगांमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना रोगमुक्‍त डाळिंब रोपे मिळण्यासाठी बागायतदार संघ, कृषी विभाग, राष्ट्रीय संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांनी संयुक्‍तरित्या प्रयत्न करावे. डाळिंब बागायतदार संघाने डाळिंबाच्या विविध प्रक्रियायुक्‍त पदार्थांचे ब्रॅंड तयार करावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाळिंबावरील एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. विश्‍वनाथा बोलत होते. डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, उपसंचालक उद्यानविद्या एम. एस. त्र्यंबके, पुणे येथील पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक (निर्यात) डी. एम. साबळे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भगवान ढाकरे, उपसंचालक विलास नलगे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुरेश जगताप उपस्थित होते.
संशोधन संचालक डॉ. शरद गडाख म्हणाले, डाळिंबाखालील देशातील 70 टक्‍के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. विद्यापीठाने डाळिंबाच्या गणेश, जी 137, मृदुला, आरक्‍ता, फुले आनारदाना, फुले भगवा सुपर हे वाण विकसीत केलेले आहे. डाळिंब हे फळ पीक शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न देणारे पीक ठरत आहे. विद्यापीठामध्ये तेलकट डाग प्रतीकारक्षम वाण, लवकर पक्‍व होणारा वाण यावर संशोधन सुरू आहे.
यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. विनय सुपे, डॉ. अशोक जाधव, डॉ. किरण रघुवंशी, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. पी. ई. मोरे, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. अनिल दुरगुडे, नीलेश गायकवाड, डॉ. ए. एन. नवले, सुरेश जगताप यांनी डाळिंबाच्या तेलकट डाग रोगाचे निर्मुलन, डाळिंबावरील मर रोगाचे, सुत्रकृमीचे नियंत्रण, डाळिंबाच्या टिश्‍युकल्चर रोपांची लागवड योग्य की आयोग्य, खत व्यवस्थापन, जैविक कीड नियंत्रण, डाळिंब निर्यात, शेतकरी उत्पादक संस्था आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. मारुती बोराटे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जास्त खते, पाणी, औषधांमुळेच रोग…
शहाजीराव जाचक म्हणाले, शेतकरी डाळिंबास प्रमाणापेक्षा जास्त खते, औषधे आणि पाणी देतात. त्यामुळे तेलकट डाग, मर रोग यासारखे रोगाच्या मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. डाळिंब व्यवस्थापनाचा खर्च कमी करणे गरजेचे आहे. डाळिंब उत्पादक संघ, कृषी विभाग, डाळिंबावरील राष्ट्रीय संशोधन संस्था आणि कृषि विद्यापीठांनी डाळिंब पिकावर एकत्र काम केले तर डाळिंबाला उज्ज्वल भवितव्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)