डाळिंबाचे पाणी पोहोचले गावाच्या नळपाणी योजनेला

संगमनेर, दि. 18 (प्रतिनिधी)- उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने पाणीटंचाईही आता संगमनेरचा पठार भाग म्हणून ओळख असलेल्या घारगाव, बोटा या परिसरातील अनेक गावांना भासू लागली आहे. यंदाच्या मे महिन्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे साठवण तलावातील पाणीही गायब झाल्याने या भागात असलेल्या खंदरमाळवाडी या दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावाला गेल्या दहा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. पाण्यासाठी वणवण भटकंती पाहून सरपंच वैशाली किशोर डोके अस्वस्थ झाल्या होत्या. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या विहिरीतून नळपाणी योजना राबविण्यात येत होती ती विहिरीच कोरडी पडल्याने गावाचा पाणीप्रश्‍न गंभीर झाला. पण, सुनील विधाटे, दत्तात्रेय लेंडे यांनी स्वतःच्या शेतीतील डाळिंब जगविण्यासाठी केलेल्या पाइपलाइनचे पाणी या विहिरीत सोडून खंदरमाळवाडी गावाचा पाणीप्रश्‍न सोडविला.
संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागात पाणीटंचाई नवीन नाही; पण यंदाच्या उन्हाने कहर केला. वैशाली डोके या पंचायत समितीच्या सदस्य असताना तत्कालीन सदस्य विनायक भोईटे यांच्या सहकार्याने गावासाठी पाणी योजना केली. 2004 मध्ये ही योजना झाली. या गावापासून तीन ते चार किलोमीटर मुळा नदीचे पात्र आहे. या नदीपात्रात एक साठवण तलाव असून त्या तलावातून ही पाणीयोजना करण्यात आली. गावातील विहिरीत तीन ते चार किलोमीटर पाइपलाइन करून पाणी सोडण्यात आले होते. या विहिरीतून नळपाणी योजनेच्या माध्यमातून गावाला पाणी देण्यात येते. या विहिरीशेजारी पाणीचे शुद्धीकरण करण्यासाठी शोषखड्डा घेण्यात आला असून, त्यात मुळा नदीचे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून सोडून ते पाणी नंतर विहिरीत सोडण्यात येते. त्यानंतर तेथून थेट ग्रामस्थांच्या घरात नळपाणी योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु, गेल्या दहा दिवसांपासून मुळा नदीपात्र कोरडे पडल्याने ही योजना बंद झाली.
विहिरीत पाणी नसल्याने नळाला पाणी येईना. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी दररोज तीन ते चार किलोमीटर भटकंती करावी लागत होती. वैशाली डोके व किशोर डोके यांना गावाचा पाणीप्रश्‍न स्वस्थ बसू देत नव्हता. या विहिरीजवळ सुनील विधाटे व दत्तात्रेय लेंडे यांची डाळिंबाची बाग आहे. दोघांची सुमारे तीन ते साडेतीन एकर बाग असून ती वाचविण्यासाठी या दोघांसह त्यांच्या दोन सहकारी अशा चौघांनी मुळा नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या साठ्यातून पाणी आणले होते. सुमारे 32 लाख रुपये खर्च करून या चौघांनी पाच इंची पाइपलाइन केली. सुमारे 15 हजार फूट ही पाइपलाइन असून शेतातील डाळिंब वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु, डोके दाम्पत्यानी विधाटे व लेंडे यांना गावाचा पाणीप्रश्‍न समजून सांगितला. आज गावाला पिण्यासाठी पाणी नाही, शेतीचे पाणी विहिरीत सोडले तर पाणीप्रश्‍न मार्गी लागेल, अशी विनंती डोके यांनी केल्यानंतर विधाटे व लेंडे यांनी ती विनंती मान्य करून लगेच या पाइपलाइनमधून विहिरीत पाणी सोडले. बुधवारी दुपारी या विहिरीत पाणी आल्यानंतर आज गुरुवारी सकाळी या गावाला थेट नळपाणी योजनेच्या माध्यमातून पाणी मिळाल्याने या गावाचा पाणीप्रश्‍न सुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)