डाटा चोरीच्या भीतीने माहिती देण्यास टाळाटाळ

चोवीस तास पाणीपुरवठा सर्व्हेक्षण : महापालिका घेणार गणेश मंडळांची मदत


वैयक्तिक माहिती चोरी किंवा आर्थिक फसवणूक होण्याची नागरिकांमध्ये भीती

पुणे – काही तरी विकण्याच्या किंवा माहिती घेण्याच्या निमित्ताने घरात येऊन वैयक्तिक माहिती घेऊन चोरी किंवा आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रकाराचा नागरिकांनी धसका घेतला असून, त्याचा फटका चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या सर्व्हेक्षणावर झाला आहे. या सर्व्हेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आता गणेश  मंडळांमार्फतच करणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी शहरात “एल अॅन्ड टी’ आणि “जैन एरिगेशन’ या दोन कंपन्यांमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक घरी जाऊन हा सर्व्हे करण्यात येत आहे. मात्र, सर्व्हेक्षण करण्यासाठी आऊटसोर्सिंग करण्यात आलेल्या व्यक्तींना नागरिकांकडून माहिती दिली जात नसल्याचे दिसून आले आहे. सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र आणि महापालिकेचे अधिकृत पत्रही देण्यात आले आहे. मात्र, नागरिक त्यावरही विश्वास ठेवत नसल्याने संपर्क करण्यासाठी मोबाइल नंबर, इमेल आयडी देत नसल्याची तक्रारही सर्व्हे करणाऱ्या लोकांनी केली आहे. त्यामुळेच साडेआठ लाख मिळकतींमध्ये सव्वादोन लाख नळजोडधारकांपैकी 30-35 हजार लोकांचा डाटाही गोळा करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

ज्या कंपनीला हे काम दिले आहे. त्या कंपनीने सर्व्हेक्षणासाठी शहरात सहा टीम तयार केल्या आहेत. ही टीम शहरात नेमून दिलेल्या भागांमध्ये जाऊन सर्व्हे करत आहे. हे काम सुरू होऊन दोन महिने झाले तरी 20 टक्केही काम ते पूर्ण करू शकले नाहीत. या सर्व्हेमध्ये मिळकतधारकाचे नाव, रहिवासी मिळकत की बिगरनिवासी, मोबाईल क्रमांक, इ-मेल आयडी, मिळकत क्रमांकाबरोबर घरातून कुटुंबातील आणखी एक कायमस्वरुपी संपर्क क्रमांक मागितला जातो. मात्र, तोही मिळत नाही. या सर्व्हेसाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

आणखी एक अडचणीची गोष्ट म्हणजे डाटा विकला जाण्याचा प्रकार बड्याबड्या कंपन्यांकडून झाल्याने नागरिकांनी त्याचाही धसका घेतल्याने माहिती न देण्याचे तेही एक कारण आहे. परंतु, गोळा केलेली माहिती अन्य कोणालाही देऊ नये, असे बंधन या कंपन्यांना घातले असून तसे पत्रही दिले आहे.

ही अडचण ओळखून महापालिकेने आता गणेश मंडळांची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, मंडळांमध्ये फ्लेक्‍स लावून जनजागृती करण्यात येणार आहे. तसे त्यांना पत्रही देण्यात येणार आहे. याशिवाय प्रसार माध्यमांवरुनही जनजागृती करण्यात येणार आहे.

– व्ही.जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)