डागडुजीअभावी फुगेवाडी रुग्णालय जर्जर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. या रुग्णालयात अनेक सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. यामुळे, रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. महापालिकेच्या वैद्यकिय प्रशासनाने या रुग्णालयांची तातडीने डागडुजी करण्याची आवश्‍यकता आहे.

या रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. मात्र, इतर आजारावर उपचार केले जात नाहीत. तसेच, गरोदर महिलांची केवळ तपासणी करुन वायसीएम रुग्णालयात पाठविले जाते. सद्यस्थितीत शहरात फैलावलेल्या “स्वाईन फ्लू’ची लस फुगेवाडी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने ती इतर ठिकाणाहून मागविण्यात येते. या रुग्णालयात सकाळ-सायंकाळी रुग्णांची गर्दी असते. दर दिवशी सुमारे 80 ते 90 रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयाची “ओपीडी’ सकाळी आठ ते 12 या वेळेत सुरु असते. या रुग्णालयाच्या आजूबाजूचा परिसर मोठा असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, उपचारासाठी येणाऱ्या सुविधांअभावी त्यांची गैरसोय होते.
रुग्णालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाली आहे. पाण्याच्या नळांची गळती सुरु आहे,

-Ads-

वॉश बेशिनचे नळ तुटलेले, काचा फुटलेल्या, फरश्‍या फुटलेल्या आहेत. तसेच, रुग्णालयाच्या आवारातच कचरा कुंडी वाहत असून वेळच्या-वेळी कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. याचबरोबर, भिंतीवरील रंग जाऊन त्याजागी काळा थर साचल्याने रुग्णालयाची शोभा कमी होत आहे. या समस्यांमुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात साफ-सफाई ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी वाढवण्याची आवश्‍यकता आहे. वेळेवर स्वच्छता होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचारी रुग्णांची सेवा उत्तमरित्या करत असल्याचे दिसून आले. रुग्णालय प्रशस्त असूनही देखभालीचा अभाव आणि महापालिकेच्या प्रशासकीय वैद्यकिय विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाची रया गेली आहे. कोट्यावधी रूपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालये उभारली जातात. मात्र स्वच्छतेचा अभाव आणि महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा याचा फटका रुग्णांना बसत आहे.

रुग्णालयात दर गुरुवारी लसीकरणाची मोहीम राबविली जाते. तसेच, सद्यस्थितीत सुरु असलेले रुग्णालय 2013 मध्ये सुरु करण्यात आलेले आहे. मात्र, फुगेवाडी येथील विठ्ठल मंदिराजवळील मोकळ्या जागेत येत्या काही दिवसात रुग्णालय स्थलांतरीत करण्याबाबत पत्र आले आहे. याबाबत, पुढील कार्यवाही प्रशासन करणार असल्याची माहिती फुगेवाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री शेणॉय यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)