डाकसेवकांच्या संपामुळे टपाल कार्यालयाचे कामकाज कोलमडले

परिसरातील 12 ते 14 गावांचे टपाल साकुर कार्यालयात पडून
संगमनेर – डाकसेवकांच्या संपामुळे तालुक्‍यातील साकूर (ता. संगमनेर) येथील टपाल कार्यालयातील कामकाज कोलमडले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या व त्यांच्या नातेवाईकांचे सुख-दु:ख तसेच विविध वार्तालापाचे दैनंदिन काम करणारे खातेबाह्य टपाल कर्मचारी 22 मे पासून बेमुदत संपावर गेले आहेत.
या संपामुळे ग्रामीण भागातील टपालांचा बटवडा आणि दैनंदिन आर्थिक कामकाजाचा पूर्णत बोऱ्या उडाला आहे. साकुर सब पोस्ट अंतर्गत हिवरगाव पठार, जांबुत, कौठेमलकापूर, मांडवे बु., बिरेवाडी, शिंदोडी, मांडवे खु., देसवडे, काळेवाडी, टेकडवाडी, देववाडी, पिंपळगाव देपा-मोधळवाडी, साकुर फाटा या सर्व शाखांचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
त्यामुळे टपाल व्यवस्था कोलमडून सर्वच गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पोस्टांतर्गत असणारे पत्रव्यवहार, मनिऑर्डर, टपाल वितरण, पार्सल, स्पीड पोस्ट, बॅंका-पतसंस्थांच्या नोटीसा, ग्रामपंचायत, शाळा आदींचे महत्वाचे पत्रव्यवहार साकुर पोस्टात पडून आहेत. टपाल वेळेत पोहच होत नसल्याने नागरिकांना संपाचा नाहक मनस्ताप होत आहे. कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे पोस्टमास्तर पी. एस. महामिने यांच्यावरही अतिरिक्‍त ताण आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या संपामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
आमच्या मागण्यांकडे दुर्लक्षच..
सातव्या वेतन आयोगासह पेन्शन मिळावी, नोकरीत कायम करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. आम्ही यापूर्वीही वारंवार आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठलेही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही. परिणामी मागण्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. तेव्हा केंद्र सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य करून यात तोडगा काढावा, अशी मागणी डाक सेवक माधव गडगे, मुनीर सय्यद, बबन गाडेकर, अनिल गाडेकर, वैशाली देवरे, मंगल वावरे, नारायण राउत, विनायक आहेर यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)