डाई-ईची प्रकल्पाचे गुजरातमध्ये स्थलांतरण?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड कामगारनगरीतील जुना कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासारवाडी येथील डाई-ईची प्रकल्पाचे गुजरात येथे स्थलांतरण सुरु केले आहे. त्यास कामगारांचा तीव्र विरोध आहे. स्थलांतरणा विरोधात कामगारांनी मागील तीन दिवसांपासून (दि. 25) कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कारखाना शहरातील जुन्या उद्योगांपैकी एक आहे. डाई-ईची करकरिया या नावाने 54 वर्षापूर्वी हा कारखाना सुरु झाला. या कारखान्यात उत्पादनाशी संबंधित शेकडो कामगार काम करीत आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कारखाना गुजरात येथे स्थलांतरीत करण्यासाठी सुरूवात केली आहे. त्यासाठी कारखान्यातील मशिनरी काढून गुजरातकडे रवाना करण्यात येत आहेत. कोणतीही पुर्वकल्पना न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. याविरोधात हिंद कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अधिक माहिती देताना कैलास कदम म्हणाले की, कामगारांना देशोधडीला लावणारा हा निर्णय व्यवस्थापनाने कामगार संघटना, राज्य सरकार, उद्योग मंत्रालय, श्रम मंत्रालय यांना अंधारात ठेवून घेतला आहे. याविरोधात हिंद कामगार संघटनेने न्यायालयाकडून धाव घेवून स्थगिती आदेश मिळविला आहे. व्यवस्थापनाने यापूर्वीच कोणतीही लेखी सूचना न देता कामगारांची बस आणि कॅन्टिन सुविधा बंद केली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी रात्री अपरात्री कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करून व्यवस्थापन मशिनरी हलविण्याचे काम करीत आहे. कामगारांची ही फसवणूक लक्षात आल्यामुळे कामगारांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

न्यायालयाच्या आदेशाची व्यवस्थापनाने अंमलबजावणी करावी, सर्व कामगारांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची सेवा उपदान (ग्रॅज्युईटी) रक्कम व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनाही फरकासह ग्रॅज्युईटी मिळावी. कायद्याप्रमाणे पूर्व प्रथेप्रमाणे फरकासह बोनस मिळावा. काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे, 2008 पासून प्रलंबित असलेला वेतन करार मार्गी लावावा, उत्पादनाचे स्थलांतरण रद्द करुन कारखाना पुर्ववत सुरु करावा आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, याबाबत डाई-ईची कारखान्याचे सरव्यवस्थापक संजय पुरो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)