डराव डराव…

नीलिमा पवार

डराव डराव डराव का ओरडता उगाच राव
पत्ता तुमचा नव्ह्ता काल कोठुनी आला सांगा नाव…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेजारचा बंड्या जोरजोरात कविता म्हणत होता. एकदा दोनदा तीनदाः.. म्हणून झाली; पण त्याला काही डराव डराव म्हणण्याचा कंटाळा येईना. उघड्या अंगाने अंगणात बसून तो मोठमोठ्याने ती म्हणतच होता. त्याला घरात बोलवायला त्याची आई बाहेर आली होती, मला पाहून ती म्हणाली,-त्याच्या मामांने त्याला ही कविता शिकवली आहे. आणि तेव्हापासून तो तेच सारखे घोकत आहे-डराव डराव… बंडू परवा गावाला गेला होता, मामाकडे. मामाच्या घरासमोरच्या डबक्‍यात रात्री बेडूक ओरडत होते. ते त्याने ऐकले. तो वेगळाच आवाज ऐकून बंड्याने मामाला विचारले, मामा, हा कसला आवाज? बंड्याने काही पुण्यात राहून बेडूक पाहिले नव्हते आणि त्यांचा आवाजही ऐकला नव्हता. त्यामुळे तेथे बेडकांचा आवाज ऐकल्यानंतर त्याने मामाबरोबर जाऊन मुद्दाम डबक्‍यातले बेडूक पाहिले. त्याला मोठे कौतुक वाटले बेडकांचे आणि बेडकांचे कौतुक वाटणाऱ्या बंड्याचे मामाला कौतुक वाटले.

बेडूक पाहून घरी आल्यानंतर मामाने बंड्याला डराव डराव का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव ही कविता शिकवली. आणि बेडकांच्या तीनचार गोष्टीही सांगितल्या. बेडूक आणि बैल ही एक गोष्ट आणि बेडकांचा राजा ही दुसरी गोष्ट. या गोष्टी घरी आल्यावर आम्हा सगळ्यांना संगितल्या. आणि तिसरी एक गोष्ट सांगितली, दोन बेडकांची. एकदा दोन बेडूक दुधाच्या भांड्यात पडतात. त्यांना काही बाहेर पडता येत नाही. एक निराश होतो, प्रयत्न सोडून देतो आणि दुधात बुडून मरतो. दुसरा मात्र प्रयत्न सोडत नाही. दुधात पोहत राहतो. पोहत राहिल्याने दूध घुसळले जाते. त्यात लोणी तयार होते. मग तो प्रयत्नशील बेडूक लोण्याच्या गोळ्यावर चढून बाहेर उडी मारतो आणि आपला जीव वाचवतो.

खरं तर बेडूक हा प्राणी काही आकर्षक नाही. आणि कोणाचाही आवडता तर मुळीच नाही. (फार तर चिन्यांचा असेल. चिनी लोक बेडूक खातात असे लहानपणी कोणी सांगायचे आंणि आम्ही ते अगदी नवलाईने ऐकायचो.) आणि तसा तो फारसा परिचयाचाही नाही. शहरातील मुलांच्या तर अजिबात परिचयाचा नाही. मुळात फक्त पाऊस पडल्यानंतर काही काळ जमिनीवर वावरणाऱ्या बेडकाला शहरातील वातावरण फारसे भावत नाही.,,ओलावा नाही, मातीच नाही तेथे बेडूक कोठून येणार?

पाण्याचे साठे-नदी. तलाव अगदी डबकीसुद्धा हे बेडकाची निवासस्थाने. वर्षभर जमिनीखाली दडी मारून राहिलेले बेडूक पहिल पाऊस पडताच बाहेर पडून आपले डराव डराव सुरू करतात. लहान गावात, विशेषत: कोकणात तर संध्याकाळनंतर जमलेली बेडकांची मैफल रात्रभर चालते. त्यात सगळ्या प्रकारचे सूर लागलेले असतात. बाकी वर्षभर बेडूक कोठे आणि कसे राहतात हे एक कोडेच आहे. बेडकांचे रंग-रूप-आकार अगदी विविध प्रकारचे असते. हाताच्या बोटाच्या नखाएवढ्या बेडकांपसून ते भल्या मोठ्या तांब्याएवढ्या बेडकांपर्यंत अनेक प्रकारचे बेडूक आढळतात. विषारी बेडूक असतात आणि अगदी आकर्षक रंगीबेरंगी बेडूकही असतात.

इंग्रजीत बेडकांसाठी फ्रॉग आणि टोड असे दोन शब्द आहेत. पण त्यांच्यातील नेमका फरक फरक मात्र आजवर मला कळला नाही आणि फ्रॉग आणि टोडला मराठीत वेगवेगळी नावे असल्याचेही माहीत नाही. बहुदा नसावीत.
मात्र नंतर मी फ्रॉग आणि टोड यातील फरक्‍ शोधला. फ्रॉगची त्वचा ओलसर आणि मऊ असते, तर टोडची त्वचा ख्डबडीत आणि कोरडी असते, बेडकाचे पाय टोडच्या पायांपेक्षा अधिक लांब असतात. अशी माहिती मला मिळ्ली.

दोन बेडकांची आणखी एक गोष्ट मला माहीत आहे. खरं तर ती इसापनीतीत वगैरे असायाला पाहिजे होती. ती गोष्ट थोडक्‍यात अशी एक तळ्यात राहंणारे दोन बेडूक एकदा दुष्काळात तळ्यातील पाणी आटल्यामुळे तळ्यातून बाहेर पडले. जाताना त्यांना एक खोल विहीर दिसली. एक बेडूक म्हणाला, तळ्यात पाणी नाही, चल आपण विहिरीत जाऊ. दुसरा विचार करून म्हणाला,
विहिरीत जाणे तर सोपे आहे. पण समजा विहिरीतील पाणी आटले, तर आपल्याला बाहेर पडता येणार नाही. आणि ते दोघेही पुढे निघून गेले. खरं तर किती चांगली गोष्ट आहे. बोध घेण्यासारखी. पण आपण ” कूपमंडूक वृत्ती’ म्हणून बेडकांना बदनाम करून ठेवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)