डफळवाडीत पाण्यासाठी लांबच लांब रांगा

तीन महिन्यापासून भीषण पाणी टंचाई; नवीन पाईपलाईनची ग्रामस्थांची मागणी

भीषण पाणी टंचाईला प्रशासनच जबाबदार
डफळवाडी येथील नागरिकांवर भीषण पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. याला सर्वस्वी प्रशासनाचे अधिकारीच जबाबदार आहेत. उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता प्रशासनाने याठिकाणची नादुरुस्त पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे.

दिलीपराज चव्हाण
उंब्रज – डफळवाडी, ता. कराड येथील सुमारे चारशे लोकवस्तीच्या गावातील लोकांचे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी आतोनात हाल होत आहेत. पहाटेपासून पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. नादुरुस्त झालेली जुनी पाईपलाईन बदलून याठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या डफळवाडी, ता. कराड या एकशे पन्नास कुटूंबाच्या गावात सध्या भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे. शेती वरती अनेक कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. या गावातील बहुतांश मंडळी नोकरीसाठी पुणे, मुंबई येथे आहेत. गेल्या तीन महिन्यापासून येथे पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. गावातील बोअरचे पाणी टाकीत येत असते. ती बोअर सध्या फक्त अर्धा ते पाऊण तास चालत आहे. पाणी खूप खोलवर गेल्याने गावातील टाकीत कमी पाणीसाठा होत आहे. परिणामी सकाळी लोक पाण्यासाठी या टाकीवर रांगा लावतात. फक्त दोन ते तीन घागरी पाणी मिळत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

दिवसभर रानातील खाजगी बोअर, खाजगी विहीर येथून घरखर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय करण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु असते. तर जनावरांना पाणी पाजण्यासाठी शिवारात न्यावे लागत आहे. जुन्या गावच्या विहीरीतून मुख्य पाण्याच्या टाकीत येणारी पाईपलाईन सध्या नादुरुस्त आहे. ती दुरुस्त केल्यास त्याद्वारे पाणी मुख्य टाकीत आल्यास ग्रामस्थांना थोडा तरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन विहीर ते गावातील पाण्याची टाकी ही पाईपलाईन नवीन टाकण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here