ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार

प्राध्यापकांचा इशारा : दिवाळीही साजरी करणार नाही

पुणे – राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना शंभर टक्‍के अनुदान मिळावे, या मागणीसाठी प्राध्यापकांनी सुरू केलेले उपोषण आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच होते. प्राध्यापकांच्या कुटुंबियांनीही आता आंदोलनात सहभाग घेतला आहे. शासनाकडून ठोस निर्णय होऊपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. असा इशाराही आंदोलनातील प्राध्यापकांनी दिला आहे. यंदा दिवाळीही साजरी न करण्याचा निर्णय या प्राध्यापकांनी घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता दिलेल्या कायम विनाअनुदानित तत्त्वावरील 53 महाविद्यालयांना शंभर टक्‍के अनुदान मिळावे, यासाठी कायम विना अनुदानित महाविद्यालयाच्या राज्य कृति समितीने 1 नोव्हेंबरपासून उच्च शिक्षण संचालनालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यात 100 प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे. सोमवारपासून या आंदोलनात प्राध्यापकांच्या पत्नी व मुलांनीही सहभाग घेतला आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेल्या अठरा वर्षांपासून कायम विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणारे प्राध्यापक व कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. बहुसंख्य महाविद्यालये पगारच देत नाहीत. काही महाविद्यालये पगारापोटी तुटपूंजी रक्‍कम देतात. ही रक्‍कमही चार-चार महिने मिळत नाही, अशी व्यथा उपोषणाला बसलेल्या प्राध्यापकांनी शासनाकडे अनेकदा मांडली. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना शंभर टक्‍के अनुदान मिळावे यासाठी शासनाकडे अनेकदा मागणी केली. मात्र, अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. जयेश पाटील, प्रा.आर. व्ही. शिंदे, प्रा. धीरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

उच्च शिक्षण संचालकांकडून उपोषण मागे घेण्याची विनंती
राज्यातील 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता दिलेल्या कायम विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांसंदर्भातील नस्ती वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी सादर करण्यात आल्या आहेत. ही बाब उपोषणकर्त्यांना अवगत करावी व उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती करण्यात यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी द. व. खारके यांच्याकडून उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना लेखी स्वरुपात प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार डॉ. माने यांनी कायम विनाअनुदानित महाविद्यालयाच्या राज्य कृती समितीला लेखी पत्र दिले आहे. उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)