ठोस कृती करण्याची वेळ (भाग-१)

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्यांची नियुक्ती पक्षांच्या प्रमुखपदी करण्याच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. “जो माणूस स्वतः निवडणूक लढविण्यास अपात्र आहे, तोच आता पक्षाचा प्रमुख बनून उमेदवारांची निवड करतो, हे गंभीर आहे,’ असे न्यायालयाने म्हटले आहे. निवड केलेल्यांपैकी काहीजण निवडून येण्याची तसेच सरकारमध्ये सामील होण्याची शक्‍यता आहे. या परिस्थितीवर नेमके बोट ठेवून न्यायालयाने सरकारला विचारले आहे की, जी व्यक्ती स्वतः निवडणूक लढवू शकत नाही, तर ती राजकीय पक्ष कसा काय स्थापन करू शकते? आमदार-खासदारांवर असलेल्या आरोपांची लवकरात लवकर शहानिशा करण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यापाठोपाठ ही टिप्पणी न्यायालयाने केली आहे. कलंकित नेत्यांच्या विषयावर केलेली ही टिप्पणी अत्यंत मार्मिक आहे. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखायचे, हे आता सरकार आणि निवडणूक आयोगाने ठरवायचे आहे.

ठोस कृती करण्याची वेळ (भाग-२)

-Ads-

ओमप्रकाश चौटाला आणि लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या काही नेत्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. परंतु तरीही हे नेते त्यांच्या पक्षांमधील “सर्वेसर्वा’ मानले जातात. हे चुकीचे असले, तरी याबाबत अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी न्यायालयाने केंद्र सरकारकडे सोपविली आहे. निवडणूक आयोगाने यासंबंधी आपली बाजू मांडताना असे सांगितले की, 1998 पासूनच आयोग अशा निर्णयाची अपेक्षा करीत आहे. परंतु कलंकित नेत्यांनी राजकीय पक्षांचे नेतृत्व करू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडे पुरेसे अधिकार दिलेले नाहीत. संसदेत यासंबंधी कायदा करून तशी तरतूद केली, तर ती अंमलात आणण्याचा प्रयत्न आयोग नक्की करेल. देशातील राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून आणखीही काही निर्देश दिले जाण्याची गरज आयोगाने व्यक्त केली. अर्थात, हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत पोलिस ज्यांच्यावर गुन्हा दाखल करतात, त्यापैकी अवघ्या 10 टक्के लोकांचा गुन्हा शाबीत होऊन त्यांना शिक्षा होते, हे वास्तवही आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेक प्रकरणांतील साक्षीदार न्यायालयात साक्ष फिरवतात. राजकीय आणि आर्थिक ताकदीपुढे ते टिकाव धरू शकत नाहीत.

– प्रा. पोपट नाईकनवरे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)