ठोसेघर परिसरात शेतकर्‍यावर अस्वलाचा प्राणघातक हल्ला

ठोसेघर, दि. 10 (प्रतिनिधी) – जावली तालुक्‍यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या कारगाव परिसरातील पांढरपाणी वस्तीतील भगवान बाबुराव माने (वय 45) यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. ही घटनी शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अस्वलाच्या हल्ल्यात माने यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भगवान माने हे शनिवारी नेहमीप्रमाणे पांढरपाणी परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चारत असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानकपणे एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने माने गोंधळून गेले. यावेळी अस्वलाने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, बुधवारीच कारगाव येथील प्रकाश कोकरे यांच्या घरात घुसून बिबट्याने वासरावर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना ताजी असताना आज पुन्हा अस्वलाने माने यांच्यावर हल्ला केल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळातच कारगाव, पांढरेपाणी, पिसाडी ही गावे बफर झोनमध्ये येतात. या गावांच्या आसपास घनदाट झाडी व जंगल आहे. त्यामुळे या गावांच्या परिसरात नेहमीच हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो.
कारगाव, पीसाडी, पांढरे पाणी या वाड्या-वस्त्यांना आजही रस्त्याची सुविधा नाही. त्यामुळे गावापर्यंत वाहन पोहोचत नाही. भगवान माने यांच्यावर दुपारी हल्ला झाला असला तरी संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी वाहनच उपलब्ध झाले नव्हते. एकीकडे मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना जंगली श्वापदांकडून होणाऱ्या वारंवार हल्ल्यांमुळे कारगाव,पिसाडी, पांढरे पाणी मधील ग्रामस्थ हतबल झाले आहेत. वनविभागाने तत्परतेने या बाबतीत योग्य ती काळजी घेत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)