ठोंबरे दांपत्याने देहदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी

पाचगणी, दि. 7 (प्रतिनिधी) – रक्तदान, अन्नदान त्यानंतर अवयव दान अशा विविध रुपात दान करुन समाजातील अनेकजण सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. अशाचप्रकारे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मरणोत्तर देहदान करुन बावधन येथील रवींद्र पद्माकर ठोंबर आणि सौ. शकुंतला रवींद्र ठोंबरे या दांपत्याने समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. ठोंबरे दांपत्याच्या या अनोख्या कार्यामुळे समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुकही होत आहे. विशेष म्हणजे रवींद्र ठोंबरे हे पोलीस दलात कार्यरत असल्याने खाकीतील देवमाणूस म्हणूनही त्यांचा नामोल्लेख होऊ लागला आहे.
बावधन येथील रवींद्र ठोंबरे हे पोलीस दलात सेवा बजावत असून सध्या ते पाचगणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सातारा पोलीस अधीक्षक यांचे वाहनचालक म्हणून तब्बल 12 वर्ष त्यांनी काम केले आहे. ठोंबरे यांचा 2012 साली राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा करुन त्यांना सन्मानित करत प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. पोलीस म्हणून समाजाची सेवा करत असतानाही देहदान करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. देहदान करण्याचा मानस त्यांनी आपल्या पत्नी शकुंतला ठोंबरे यांना सांगितला. त्यांनीही ठोंबरे यांच्या हो मध्ये हो मिसळत मीदेखील देहदान करणार असे सांगितले. त्यानुसार दोघा पती-पत्नीने कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन मरणोत्तर देहदान करण्याचा मानस सत्यात उतरविला आहे. जोपर्यंत जीवत आहे तोपर्यंत जमेल तेवढ चांगला करायचच, परंतु मरणानंतरही आपला देह दुसऱ्याच्या उपयोगी यायला पाहिजे असे त्यांचे नेहमीच मत होते. त्या अनुषंगानेच त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करुन तो प्रत्यक्ष अंमलात आणला आहे. ठोंबरे दांपत्याच्या या सामाजिक बांधिलकीचे पोलीस खात्यातून तसेच समाजाच्या इतर स्तरातूनही गौरव होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)