ठेकेदारीवर आता “वॉच’

महापालिका आक्रमक : विकास कामांचे फोटो, चित्रीकरण बंधनकारक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्त्यांच्या कामांपासून ते ड्रेनेज चोकअप काढण्याच्या कामापर्यंत सर्व प्रकारच्या कामांचे फोटो व चित्रीकरण केले जाणार आहे. महापालिकेने त्यासाठी खास “मोबाईल ऍप्लिकेशन’ विकसित केले आहे. काम सुरू करण्यापूर्वीची स्थिती, काम सुरू असतानाची स्थिती आणि काम पूर्ण झाल्यानंतरची स्थिती अशा तीनही टप्प्यांत ठेकेदाराला आणि महापालिका अभियंत्यालाही फोटो व चित्रीकरण करणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ठेकेदाराच्या या कामचे बील दिले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध प्रकारची नागरी विकास कामे, देखभाल दुरूस्तीची कामे तसेच विविध प्रकल्पाची कामे करण्यात येतात. या कामांच्या वस्तुस्थितीचे अवलोकन होण्यासाठी तसेच त्या कामांवर नियंत्रण राखण्याकरिता आणि जनतेलाही या कामांची माहिती होण्यासाठी महापालिकेने संगणकीय कार्यप्रणाली आणि मोबाईल ऍप्लीकेशन विकसित केले आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.

महापालिकेमार्फत या कार्यप्रणालीमध्ये कामाची प्रथमत: नोंद केल्यानंतर काम सुरू करावे. नोंद केल्यानंतर कनिष्ठ अभियंता किंवा एजन्सी यांनी महापालिकेमार्फत विकसित केलेले “मोबाईल ऍप्लीकेशन’ डाऊनलोड करावे. ठेकेदार विैंवा अभियंत्यांनी कामाचे तीन टप्प्यांमध्ये फोटो आणि व्हिडीओ शुटींग करायचे आहे. त्यामध्ये काम सुरू करण्यापूर्वीची स्थिती, काम सुरू असतानाची स्थिती आणि काम पूर्ण झाल्यानंतरची स्थिती असे टप्पे राहणार आहेत.

25 एप्रिलपासून अंमलबजावणी…
नवीन कार्यप्रणाली आणि कामकाजाच्या सुचना संबंधित विभागातील काम पाहणाऱ्या अभियंता यांनाही लागू आहे. या अभियंत्याने या कार्यप्रणालीत कामाची नोंद करावयची असून महापालिकेने विकसित केलेले “मोबाईल ऍप्लीकेशन’ डाऊनलोड करून त्यांच्याकडे असलेल्या कामकाजाचे फोटो काढून चित्रीकरण करायचे आहे. संबंधित खातेप्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता किंवा ठेकेदार यांना स्पष्ट सुचना द्याव्यात आणि विभागप्रमुखांनी या बाबींची पूर्तता होण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी. या सुचनांची खातरजमा केल्यानंतरच ठेकेदारांच्या बीलाची पूर्तता करण्याबाबतची कार्यवाही करावी. या सुचनांची अंमलबजावणी 25 एप्रिलपासून करण्यात यावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)